बुस्टर अग्निबाण परत आणण्यातही यश
नासासाठी स्पेस एक्स या कंपनीने अवकाश स्थानकात सामान नेण्याचे काम सुरू केले असून, हे यान सोडण्यासाठी वापरलेले अग्निबाण नष्ट न होता ते परत महासागरातील जहाजावर आणण्यात यश आले आहे. याचा अर्थ आता अग्निबाणांचा फेरवापर करणे शक्य होणार आहे. मानवरहित फाल्कन अग्निबाणाने आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकासाठी सामान व एक छोटी खोलीच अवकाशात नेली आहे. ड्रॅगन हे कुपी स्वरूपाचे अवकाशयान अवकाश स्थानकाच्या दिशेने मार्गस्थ झाल्यानंतर पहिल्या टप्प्यातील बुस्टर अग्निबाण परत आले आहे. पंधरामजली बुस्टर ऊध्र्व दिशेने एका जहाजावरून गेले. स्पेस एक्सचे शेकडो कर्मचारी या वेळी उपस्थित होते. कॅलिफोर्नियात हॉथोर्न येथे या कंपनीचा काचेचे अवकाश नियंत्रण कक्ष आहे. अमेरिका.. अमेरिका.. अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. स्पेस एक्सच्या समालोचकांनी या उड्डाणाचे वर्णन अविश्वसनीय असे केले. वापरलेले बुस्टर रॉकेट म्हणजे अग्निबाण सुरक्षित परत आणण्यात डिसेंबरमधील केप कॅनव्हरॉल येथील उड्डाणात यश आले होते, पण त्या वेळी ज्या जहाजावर ते उतरणार तेथे अनेक स्फोट झाले होते. स्पेस एक्सचे संस्थापक एलन मस्क यांच्या मते उड्डाणाचा खर्च कमी करण्यासाठी अग्निबाण वापरानंतर परत आणणे गरजेचे होते. स्पेस एक्स अवकाशयानाने या वर्षांत प्रथमच सामानाची खेप अवकाशयानाकडे नेली आहे. जूनमध्येही स्पेस एक्सच्या अवकाशकुपीला दुर्घटनेस सामोरे जावे लागले होते. आता ड्रॅगन या कुपीच्या माध्यमातून ७ हजार पौंड वजनाचे सामान अवकाश स्थानकाकडे नेले आहे, ते रविवारी तेथे पोहोचेल. बिगेलो एरोस्पेस या कंपनीने अवकाश स्थानकात नेण्यासाठी छोटी खोली तयार केली असून, ती एका बेडरूमएवढी आहे. कक्षीय स्थानकातील एखादी खोली भाडय़ाने देण्याची तयारी नेवाडा येथील या कंपनीने केली असून चार वर्षांत ही सुविधा उपलब्ध होईल. मंगळ व चंद्र यांच्यावर पाठवण्यासाठीही अशा तयार खोल्या कंपनी तयार करीत आहे. २६० मैल अंतरावर अवकाश वाहतूक जास्त असते. नासाच्या ऑर्बायटल एटीके या व्यावसायिक वाहनाने मार्चमध्ये उड्डाण केले होते. ड्रॅगन कुपीत वीस उंदीर असून त्यात कोबी व लेटय़ूस या वनस्पती आहेत. त्यांच्यावर यात प्रयोग केले जाणार आहेत. द बिगेलो एक्सपांडेबल अ‍ॅक्टिव्हिटी मॉडय़ुल म्हणजे बीम ही नासाच्या २१व्या शतकातील ट्रान्सहबची आवृत्ती असून, १९९०मध्ये त्याचा आराखडा तयार असूनही जमले नव्हते. हॉटेल व्यावसायिक रॉबर्ट बिगेलो यांनी ट्रान्सहबचे हक्क विकत घेतले असून, त्यांनी बीम ही खोली अवकाशात नेण्यासाठी नासाचा मंच वापरू देण्यासाठी प्रयत्न केले व त्यात त्यांना यशही आले.