लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी आम आदमी पक्षाचे लोकसभेतील खासदार भगवंत मान यांना पुढील काही दिवस संसदेपासून लांब राहण्याच्या सूचना केल्या आहेत. सत्र संपत नाही तोपर्यंत संसदेत उपस्थित राहू नये, असे त्यांना सांगण्यात आले आहे. आपल्या मोबाईलच्या माध्यमातून संसदेच्या आवारातील दृश्ये त्यांनी फेसबुकवर लाईव्ह केली होती. त्यानंतर ते चांगलेच अडचणीत सापडले होते. या सर्व प्रकारामुळे गेल्या आठवड्यात शुक्रवारी लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले होते.
भगवंत मान यांनी केलेल्या संसदेच्या व्हिडिओ चित्रीकरण प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली आहे. या समितीत नऊ जणांचा समावेश आहे. तसेच या चौकशीचा संपूर्ण अहवाल पुढच्या महिन्यापर्यंत सादर करण्यात येणार आहे.
‘मला संसदेची सुरक्षा धोक्यात येईल असे काही करायचे नव्हते. मला फक्त येथील कामकाज कसे चालते याची माहिती द्यायची होती म्हणून मी ही क्लीप बनवली आणि फेसबुकवर अपलोड केली अशी प्रतिक्रिया मान यांनी दिली. आपण केलेल्या चुकीची माफी अध्यक्षांकडे मागितली आहे आणि त्यांनी दिलेला निर्णय मला मान्य आहे, असेही भगवंत मान म्हणाले.
‘देशातील सर्व पक्ष हे आम आदमी पक्षाविरुद्ध आहेत. येथे द्वेषाचे राजकारण चालते त्यामुळे जाणूनबुजून आपच्या खासदारांना लक्ष्य केले जात आहे, असा आरोपही त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत केला. आतापर्यंत तुम्ही कधीच पाहिले नव्हते ते मी तुम्हाला दाखवतो असे सांगत लोकसभेच्या कामकाजाची १२ मिनिटांची व्हिडिओ क्लीप भगवंत मान यांनी फेसबुकवर टाकली होती.
भगवंत मान यांनी केलेल्या कृतीमुळे संसदेची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्याचबरोबर संसदेचे सदस्य म्हणून मिळालेल्या विशेष अधिकारांवरही गदा आल्याची भावना अनेक सदस्यांनी यावेळी व्यक्त करत त्यांना धारेवर धरले होते.