अत्यंत हलाखीच्या अवस्थेत असलेल्या कुटुंबांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने लवकरच एक नवा विभाग सुरू केला जाणार असल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी येथे स्पष्ट केले. अशा प्रकारच्या विभागामुळे आत्महत्येसारखी पावले उचलण्यात येण्याच्या प्रकारांना आळा बसेल, असेही पर्रिकर म्हणाले.
राज्य सरकार आपल्या सामाजिक कल्याणकारी योजनांद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत आहे, मात्र अद्यापही काही कुटुंबांपर्यंत पोहोचणे शक्य झालेले नाही. अशा कुटुंबांपर्यंत पोहोचण्यासाठी हा विभाग प्रयत्न करणार आहे, असेही पर्रिकर यांनी वार्ताहरांना सांगितले.
गोव्यात अलीकडेच एकाच कुटुंबातील तीन जणांनी आत्महत्या केली, त्याची दखल घेऊन पर्रिकर म्हणाले की, स्थानिक स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन विशेष विभाग स्थापन करण्यात येणार असून आत्महत्यांसारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी हा विभाग प्रयत्नशील राहील, असेही मुख्यमंत्री म्हणाले. याबाबत पुढील तीन महिन्यांत योग्य मार्गदर्शक तत्त्वे आखण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.