गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यात बंद खोलीत चर्चा झाल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या चर्चेनंतर नितीशकुमार यांचा मोदीविरोध काहीसा मवाळ झाल्याने यात भर पडली आहे.
रेडीफ.कॉमच्या वृत्तानुसार बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे दिल्लीत नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी आले होते. २३ ऑगस्ट रोजी ही भेट झाली होती.  बिहारमधील पूरस्थितीसंदर्भात ही भेट झाल्याचे अधिकृतरित्या सांगण्यात आले होते. मात्र रेडीफच्या माहितीनुसार अधिका-यांसोबत चर्चा झाल्यावर मोदी आणि नितीशकुमार या दोघांनी बंद खोलीत चर्चा केली. या चर्चेदरम्यान एकाही अधिका-याला खोलीत थांबू देण्यात आले नव्हते. या चर्चेनंतर मोदी आणि नितीशकुमार हे दोन्ही नेते हातात हात घालून खोली बाहेर पडल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या. या भेटीनंतर नितीशकुमार यांचा मोदीविरोधही काही प्रमाणात शमला आहे. नितीशकुमार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केंद्र सरकारच्या नमामी गंगे या योजनेचे भरभरुन कौतुक केले. तसेच मोदींनी पूरग्रस्त भागात तातडीने दीर्घकालीन उपाययोजना राबवण्याचे आश्वासन दिल्याचे नितीशकुमार यांनी सांगितले होते.
भेटीनंतर मोदी आणि नितीशकुमार यांच्या देहबोलीवरुन बिहारमध्ये मात्र राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहे. २०१३ मध्ये नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची उमेदवारी मिळाल्यानंतर नितीशकुमार यांचा जदयू पक्ष एनडीएतून बाहेर पडला होता. बिहार निवडणुकीतही नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्याशी हातमिळवणी करुन सत्ता काबीज केली. मात्र आता बहुमत असल्याने बिहारमधील सरकारवर लालूप्रसाद यांचाच दबदबा दिसून येत आहे. त्यामुळे नितीशकुमार हे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भविष्यात बिहारमधील राजकीय समीकरण बदलते की काय यावर खमंग चर्चा रंगू लागल्या आहेत.