भारतीय वंशाच्या अमेरिकी मुलांनी लागोपाठ दुसऱ्या वर्षी इतिहास घडवताना स्क्रीप्स नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धेत सुवर्णकरंडक पटकावला आहे. दोघांना या स्पर्धेचे विजेतेपद मिळाले असून त्यांची नावे वन्या शिवशंकर (वय १३) व  गोकुळ व्यंकटाचलम (वय १४) अशी आहेत. अमेरिकन विद्यार्थी जिंकायला पाहिजेत, अमेरिकी नसलेल्या विद्यार्थ्यांचे वर्चस्व नको आहे असे वांशिक मत  ट्विटर व इतर सामाजिक माध्यमांवर व्यक्त करण्यात आले आहे. दहा लाख अमेरिकी लोकांनी ही स्पर्धा थेट प्रक्षेपणाने पाहिल्यानंतर भारतीय वंशविरोधी मते व्यक्त केली.
दोघा विजेत्यांना प्रत्येकी ३७ हजार डॉलर्स मिळणार असून इतर पारितोषिकेही मिळणार आहेत. यंदाच्या विजेतेपदासह आतापर्यंत आठ वर्षांतील स्पर्धात बाजी मारणाऱ्या १८ स्पर्धकांपैकी १४ स्पर्धक हे भारतीय वंशाचे आहेत. माजी विजेत्याच्या भावंडास विजेतेपद मिळण्याची ही पहिली वेळ आहे.
तिसरा क्रमांकही  भारतीय वंशाच्या कोल शाफर रे या ओक्लाहोमाच्या विद्यार्थ्यांने पटकावला आहे. काव्या शिवशंकर ही २००९ मधील विजेती होती. तिची बहीण वन्या शिवशंकर हिने सांगितले की, हा स्वप्न साकारल्याचा क्षण आहे. आपण आपले पारितोषिक आजीला अर्पण करीत आहोत. तिचे ऑक्टोबरमध्ये निधन झाले. कान्सास येथील वन्या शिवशंकर हिने पाचव्यांदा स्पर्धेत भाग घेतला होता. ती आठवीत असून तिने सायोटोपोएसिस, बॉउक्वेटपी व थमाकऊ या शद्बांचे स्पेलिंग बरोबर सांगितले.
व्यंकटाचलम याला बास्केटबॉलची आवड असून त्याने पोब्लासियॉन, कॉडिलीस्मो, निक्सटामल या शब्दांचेही स्पेलिंग बरोबर सांगितले. जॅकस बेली यांनी या स्पर्धेचे सूत्रसंचालन केले. वन्या हिने शेरेनस्नाइट या अवघड शब्दाचे स्पेलिंगही बरोबर सांगितले. अमेरिकेत भारतीय वंशाचे १ टक्का लोक असूनही ८८ व्या स्पेलिंग स्पर्धेत २८५ जणांनी भाग घेतला  होता.