पक्षाच्या कार्यकर्तीने केलेल्या तक्रारीवरून दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांनी ‘आप’चे नेते कुमार विश्वास यांच्यावर समन्स बजावून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आयोगाच्या अध्यक्षांनी केला असल्याचा आरोप आयोगातील एका सदस्यानेच केल्याने मंगळवारी नाटय़पूर्ण घडामोडी घडून आयोगातील अंतर्गत मतभेद चव्हाटय़ावर आले.
महिला आयोगाच्या अध्यक्षा बरखा सिंग यांच्यासह संयुक्त पत्रकार परिषदेतच त्रागा व्यक्त करून आयोगाच्या सदस्या जुही खान यांनी सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. विश्रावास यांच्यावर समन्स बजावण्याचा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोपही जुही खान यांनी केला.
महिला आयोगाने सोमवारी कुमार विश्वास यांच्यावर समन्स बजावून त्यांना मंगळवारी दुपापर्यंत आयोगासमोर हजर राहण्यास सांगितले होते. मात्र आपल्याला कोणतेही समन्स मिळाले नसल्याचे कारण देत मंगळवारी विश्वास आयोगासमोर हजर राहिले नाहीत.
 कुमार विश्वास यांच्यावर पुन्हा समन्स बजावण्यात आले असून त्यांना बुधवारी आयोगासमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे, असे पत्रकार परिषदेत बरखा सिंग यांनी जाहीर करताच त्यांच्या शेजारीच बसलेल्या जुही खान संतप्त झाल्या. राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विश्वास यांना लक्ष्य केले जात असल्याचे नमूद करून खान यांनी पुन्हा समन्स बजावण्याच्या कृतीचा निषेध केला.
राजकीय हेतूने प्रेरित होऊन नव्याने समन्स बजावण्यात आले असल्याने आपण आयोगाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर करून जुही खान संयुक्त पत्रकार परिषदेतून निघून गेल्या. तथापि, खान यांनी अलीकडेच आपमध्ये प्रवेश केला असल्यानेच त्या आयोगाच्या निर्णयाला विरोध करीत असल्याचे बरखा सिंग म्हणाल्या. आपनेच त्यांना पत्रकार परिषदेत गोंधळ घालण्यासाठी पाठविले होते, असेही त्या म्हणाल्या.
पुन्हा समन्स बजावण्याचे समर्थन करताना बरखा सिंग म्हणाल्या की, काही गोष्टी विश्वास यांच्या विरोधात गेल्या आहेत. त्यामुळे आम्ही पोलिसांकडे आणखी काही दस्तऐवज पाठविणार आहोत. कुमार विश्वास हे मंगळवारी अमेरिकेला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. ते इतका अहंकार का दर्शवित आहेत तेच कळत नाही, असेही बरखा सिंग म्हणाल्या.
बरखा सिंग या काँग्रेसच्या माजी आमदार असून त्यांचा आपच्या पहिल्या सरकारच्या कार्यकाळात सोमनाथ भारती प्रकरणावरून आपशी खटका उडाला होता.  ‘आप’च्या राजकीय नेत्यांमधील संघर्ष कमी होण्याची चिन्हे दिसत नसल्याचे अलिकडील काही घटनांवरून स्पष्ट झाले आहे.
विश्वास यांच्या बचावासाठी केजरीवाल
नवी दिल्ली: आम आदमी पार्टीच्या (आप) कार्यकर्तीने केलेल्या आरोपामुळे पक्षाचे ज्येष्ठ नेते कुमार विश्वास हे वादाच्या भोवऱ्यात सापडले असतानाच आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे विश्वास यांच्या बचावासाठी पुढे सरसावले आहेत. प्रसारमाध्यमांमधील काही घटक आमच्याविरुद्ध अश्लाघ्य आरोप करीत आहेत. त्यामुळे मौन पाळण्यावाचून आमच्यासमोर अन्य पर्याय नाही, असे केजरीवाल यांनी एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
कुमार विश्वास आणि त्यांचे कुटुंबीय या वादामुळे व्यथित झाले असून विश्वास यांच्या कन्येला शाळेत या प्रकरणावरून चिडविले जात आहे. कुमार विश्वास यांच्याशी आपले अनैतिक संबंध असल्याचे खोटेनाटे आरोप केले जात असूनही विश्वास यांनी त्याचे खंडन न केल्याने आपले वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे, असा आरोप एका कार्यकर्तीने केल्याने खळबळ माजली आहे.