‘स्टार ट्रेक’ या गाजलेल्या विज्ञान मालिकेत ‘मिस्टर स्पॉक’ ची भूमिका साकारणारे अमेरिकी अभिनेते लिओनार्ड निमॉय यांचे फुफ्फुसांच्या दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.
निमॉय यांचा शुक्रवारी सकाळी बेल एअर भागातील त्यांच्या निवासस्थानी मृत्यू झाल्याची माहिती हॉलीवूड रिपोर्टरने दिली.  ‘आयुष्य हे एखाद्या बागेप्रमाणे आहे. परिपूर्ण क्षण मिळू शकतात, पण आठवणींशिवाय इतरत्र साठवले जाऊ शकत नाहीत,’ असे त्यांनी २२ फेब्रुवारीला सर्वात शेवटच्या ट्विटरमध्ये म्हटले होते.
१९३१ साली बोस्टनमध्ये जन्मलेल्या निमॉय यांनी सर्वप्रथम १९५१ साली ‘क्वीन फॉर अ डे’ या चित्रपटात काम केले. १९५३ ते ५५ या काळात अमेरिकी सैन्यात काम केल्यानंतर त्यांनी अनेक नाटकांमध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत काम केले.
१९६६ साली सुरू झालेल्या एनबीसीच्या ‘स्टार ट्रेक’ मालिकेने निमॉय यांनी अभिनेते व दिग्दर्शकाच्या भूमिकेत काम केले, परंतु प्रेक्षकांच्या मनामध्ये त्यांची खरी ओळख  ‘मि. स्पॉक’ अशीच राहिली. या वैज्ञानिक अधिकाऱ्याच्या भूमिकेसाठी त्यांनी ‘व्ही’चे चिन्ह, ‘लिव्ह लाँग अॅण्ड प्रॉस्पर’ या अर्थाची हाताची मुद्रा आणि शत्रूंना बेशुद्ध करणारा मानेला चिमटा ही वैशिष्टय़े दिली. निमॉय यांना स्पॉकच्या भूमिकेसाठी तीन वेळा सहायक अभिनेता म्हणून एमी पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले होते.