सुरक्षा यंत्रणांसोबतच्या चकमकीत ठार झालेला दहशतवादी बुरहान वानीच्या वडिलांनी बेंगळुरुत श्री श्री रविशंकर यांची भेट घेतली आहे. श्री श्री रविशंकर यांनी ट्विटरवर ही माहिती दिली असून भेटीत विविध विषयांवर चर्चा झाल्याचे रविशंकर यांनी म्हटले आहे. हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानीचा सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत मृत्यू झाला होता. बुरहान वानीच्या मृत्यूनंतर काश्मीर खोरे हिंसाचाराने धूमसत आहे. काश्मीर खो-यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यावर फुटिरतावादी गटांशी चर्चा करण्याचे जाहीर केले होते. या घडामोडी घडत असतानाच बेंगळुरुत बुरहान वानीचे वडिल मुझफ्फर वानी यांनी आर्ट ऑफ लिव्हींगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांची भेट घेतली आहे. रविशंकर यांनी मुझफ्फर वानी यांच्यासोबतचा फोटोदेखील ट्विटरवर शेअर केला आहे. Muzaffar Wani, the father of Burhan Wani was in the ashram for the last 2 days. We discussed several issues. pic.twitter.com/IDyyxJSG83 — Sri Sri Ravi Shankar (@SriSri) August 27, 2016 मुझफ्फर वानी आणि रविशंकर यांच्या भेटीनंतर तर्कवितर्कांना उधाण आले आहे. रविशंकर यांनी या भेटीत विविध विषयांवर चर्चा केल्याचे म्हटले आहे. तर मला मधूमेह असल्याने उपचारासाठी मी दोन दिवस बेंगळुरुत रविशंकर यांच्या आश्रमात गेलो होतो असे मुझफ्फर वानी यांनी म्हटले आहे. रविशंकर यांनी माझ्यासोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली आणि म्हणूनच मी फोटो काढला असेही त्यांनी स्पष्ट केले.