काश्मीर खोऱ्यातील शाळा तब्बल आठ महिन्यांनी पुन्हा सुरू झाल्या आहेत. गेल्या वर्षी ८ जुलै रोजी हिजबुलचा कमांडर बुरहान वानी सुरक्षा दलासोबतच्या चकमकीत मारला गेल्यानंतर खोऱ्यात हिंसाचार उफाळला होता. हल्लेखोरांनी अनेक शाळांना लक्ष्य केले होते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा बंद करण्यात आल्या होत्या. आजपासून (१ मार्च) शाळा पुन्हा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आहे.

गेल्या वर्षी जुलैमध्ये हिजबुलचा कमांडर बुरहान वानी हा सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत मारला गेला होता. यानंतर काश्मीर खोऱ्यात हिंसाचार उफाळला होता. काश्मीरमधील अनेक जिल्ह्यांत संचारबंदी होती. तेथील व्यवहार ठप्प झाले होते. दगडफेकही मोठ्या प्रमाणात झाली होती. अनेक जणांना या हिंसाचारात प्राण गमवावे लागले होते. हल्लेखोरांनी अनेक शाळांना लक्ष्य केले होते. त्यामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. हिंसाचारादरम्यान मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली होती. त्यात शेकडो लोक जखमी झाले होते. तर काही जणांना प्राण गमवावे लागले होते. अनेक महिने अशांत असलेले खोरे शांत झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी थंडीच्या दिवसांत शाळांना सुट्टी जाहीर केली होती. बुधवारी सुट्ट्या संपल्या असून पुन्हा एकदा शाळा सुरू झाल्या आहेत. कडेकोट सुरक्षेव्यवस्थेत दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. शैक्षणिक वातावरण शांत राहावे, अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. शाळा बंद राहिल्याने विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान किमान भरून निघावे, असेही काही पाल्यांचे म्हणणे आहे. येथील थांब्यावर माझ्या मुलासोबत बसची वाट पाहण्याचा अनुभव कधी मिळेल, याची गेल्या सात महिन्यांपासून वाट पाहत होतो, असे सज्जाद अहमद यांनी सांगितले. सज्जाद यांचा मुलगा येथील बर्नहाल स्कूलमध्ये शिकत आहे. यावर्षी तरी खोऱ्यामध्ये शांतता राहावी, यासाठी मी प्रार्थना करेन. कारण माझ्या मुलाला शाळेत जाता येईल आणि सर्वसामान्यांपणे आपले बालपण जगता येईल, अशी प्रतिक्रिया सज्जाद यांनी व्यक्त केली.