दहशतवाद्यांनादेखील मृत्युदंडाची शिक्षा देण्यास असलेला आपला विरोध काँग्रेसचे नेते व खासदार शशी थरूर यांनी कायम ठेवला असून, सरकारने ‘खुन्यांसारखे’ वागू नये, तसेच फौजदारी न्यायव्यवस्थेत चुका आणि पूर्वग्रह यासाठी बराच वाव असल्याचे म्हटले आहे.
याकूब मेमनला फाशी दिल्यानंतर केलेल्या ट्विप्पण्यांमुळे थरूर हे अनेकांच्या टीकेचे लक्ष्य ठरले होते.
दहशतवाद्यांना पॅरोलची सवलत न देता त्यांच्या आयुष्यभर तुरुंगात ठेवायला हवे.
पूर्वीच्या काळी अशी समजूत होती, की एखाद्या व्यक्तीने कुणाचा खून केला तर त्यालाही मारले जावे. पण आता अशी अव्यावहारिक परंपरा सुरू ठेवण्याची आपल्याला काय गरज आहे, असा प्रश्न थरूर यांनी विचारला  आहे.
आपण ज्या वेळी मृत्युदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी करतो, त्या वेळी आपण प्रत्यक्षात त्यांच्यासारखेच वागत असतो. ते खुनी असले तरी सरकारने त्यांच्यासारखे वागू नये, असे मत थरूर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.