अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत अरविंद केजरीवाल, किरण बेदी यांच्यासह डझनभर ‘सिव्हिील सोसायटी’च्या लढवय्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात लढण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या. तेव्हापासून दिल्लीकरांवर केजरीवाल आदींचे ‘जंतर-मंतर’ आहे. गत विधानसभा निवडणुकीत व तत्पूर्वी अरविंद केजरीवाल यांचे चरणकमल ‘जंतर-मंतर’वर लागले होते. यंदा जंतर-मंतर सुने-सुने आहे. जंतर-मंतर म्हणजे एक गंमतच. म्हणजे येथे उपोषणाला बसता येते. कितीही दिवस उपाशीपोटी आंदोलन करा. कुणीही तुम्हाला काहीही बोलणार नाही. घेतलीच तर अण्णासारख्यांची दखल घेतली जाते. आंदोलन जसे उपाशीपोटी करता येते तसे भरपेटही करता येते. जंतर-मंतरवर उपोषणाला बसतात तिथे समोरच दोन-तीन ढाबे आहेत. साधारण २०-२५ वर्षे जुने. अनेकांची आंदोलने या ढाब्यांनी पाहिली. उपोषणाला बसणाऱ्यांच्या समर्थनार्थ जमलेल्यांचे भरपेट पोषण करण्याची जबाबदारी हे ढाबेवाला निभावतात. असो. मुद्दा आहे तो यंदा ‘जंतर-मंतर’वर ना झाडूवाले फिरकले, ना कमळवाले.     
मागील विधानसभा निवडणुकीत जंतर-मंतरवर केजरीवाल-शिसादिया-विश्वास-इल्मि यांनी एक जंगी सभा घेतली होती. चहूबाजूंनी युवक घोषणा देत होते होते. ‘केजरीवाल-केजरीवाल’ म्हणत आम आदमी पक्षाचा झेंडा खांद्यावर घेत शेकडो तरुण दिल्लीभर प्रचाराला जात असत. आम आदमी पक्षाचा हा एक अड्डा होता-मीटिंग पॉइंट म्हणा हवं तर. येथे जमून विविध मतदारसंघात प्रचाराला जायचे. नजीकच्या कनॉट प्लेस परिसरात हातात झाडू, गळ्यात ‘आप’चे उपरणे, अंगात आपचा बाह्य़ा नसलेला शर्ट लटकवून मूकपणे उभे राहायचे. प्रत्येकाची तीन ते चार तासांची डय़ुटी असे. आता ही डय़ुटी बदलली आहे. जंतर-मंतर सुनं झालं आहे. एक दोन मंडप, कुठे पेन्शनसाठी तर कुठे आसारामचे दोनेक समर्थक आंदोलन करीत असतात. पोलीसही निवांत.  आजूबाजूच्या परिसरात ‘आम आदमी’चा आवाज निनादत नाही. सहा-सात टाळकी दिसतात. ‘सीधी साधी आम आदमी पार्टी’ अशी पोस्टर्स हातात असतात. त्यावर ‘आम्ही पळपुटे नाही, आम्ही सत्तापिपासू नाही.’असं ठळकपणे लिहिलेले असते. महाविद्यालयीन पोरं असावीत. आपण कुणाचा प्रचार करतो हेदेखील त्यांना माहीत नाही. मधूनच एक रिक्षा येते. त्यात बसलेले दोघेजण त्यांना विचारतात-सबकुछ ठिक है? खानापिना हो गया? वगैरे. रिक्षाच्या मागे एक मोठ्ठं पोस्टर असतं. त्यावर किरण बेदी यांचा फोटो छापलेला. कमळाचं चिन्ह वगैरे नाही. फक्त ठळक अक्षरात लिहिलेले असते- आशा कि नई ‘किरण!’ ही ‘किरण’दूरवर जाते.
पक्षाच्या फाटाफुटीचं ‘जंतर-मंतर’ कायम राहते. दिल्लीकरांनी अनेक आंदोलने पाहिलीत. पण ‘हायटेक’ आंदोलन अण्णा हजारे यांच्या निमित्ताने अनुभवलं. त्यांच्या आंदोलनात फूट पडली. शकलं झालीत-हे सर्वात योग्य विशेषण! एकमेकांची स्तुती करताना न थकणारे एकमेकांच्या विरोधात ठाकलेत. राजकारण म्हणतात ते हेच! आम आदमी हे ‘जंतर-मंतर’ हे निमूटपणे पाहत असते.
-चाटवाला