उत्तर प्रदेश विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची गुरुवारी वादळी सुरुवात झाली. बहुजन समाज पक्ष आणि राष्ट्रीय लोक दलाच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करून अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने कागदाचे बोळे फेकले.
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून, अलाहाबादमध्ये रेल्वेस्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रथेप्रमाणे उत्तर प्रदेशचे राज्यपाल बी. एल. जोशी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांपुढे अभिभाषण करणार होते. राज्यपालांनी भाषण वाचण्यास सुरुवात केल्यानंतर बसप आणि रालोदच्या सदस्यांनी अखिलेश यादव यांच्या सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. राज्यपालांपुढे कापडी फलक फडकविण्यात आले. सभागृहामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. राज्यपाल भाषण वाचत असतानाच सदस्यांनी अध्यक्षांच्या दिशेने कागदी बोळे फेकण्यास सुरुवात केली. त्यानंतर राज्यपालांनी भाषणाची औपचारिकता काही मिनिटांत पूर्ण केली. राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार घालण्याचे भारतीय जनता पक्षाने ठरविले असल्याने ते यावेळी सभागृहात उपस्थित नव्हते.
(संग्रहित छायाचित्र)