देशातील सर्वात मोठे दुसऱ्या क्रमांकाचे वाचनालय.. महात्मा गांधींनी स्वत: लिहिलेली व त्यांच्यावर लिहिलेली अशी एकूण ४ हजार २९५ पुस्तके.. १९२१ साली स्थापन झालेले वाचनालय.. साधारण त्याच वर्षांपासून केंद्र व राज्यांनी संमत केलेल्या विधेयकांच्या ऐतिहासिक प्रती.. लाखभरापेक्षाही जास्त पुस्तके.. अशा समृद्धतेने नटलेल्या संसदीय वाचनालयाच्या आवारात प्रजासत्ताक भारताच्या आत्मसन्मानाची अर्थात राज्यघटनेची प्रत जतन केली जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त संसदेत दोन दिवस विशेष चर्चा झाली. त्यानिमित्ताने प्रजासत्ताक भारताच्या निर्मितीची कहाणी सांगणारी प्रदर्शनी संसदेत आयोजित करण्यात आली आहे. या प्रदर्शनीत जुने दृक् -श्राव्य माहितीपट, वृत्तपत्रांतील कात्रणे तसेच राज्यघटनेची मूळ लिखित प्रत खासदारांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रजासत्ताक भारताच्या निर्मितीची कहाणीच जणू या प्रदर्शनीतून सांगण्यात आली आहे.
सोमवारी दुपारी असहिष्णुतेवरील चर्चेदरम्यान निर्माण झालेला वाद सहन न झाल्याने अनेक खासदारांनी या प्रदर्शनास भेट दिली. तेथे प्रत्येक जण राज्यघटनेच्या मूळ प्रतीचे दर्शन घेत होता. काचेच्या पेटीत साधारण १९९४ पासून बंदिस्त असलेली ही प्रत राज्यघटना निर्मात्यांच्या हस्ताक्षरातील आहे. राज्यघटनेचे हस्तलिखित म्हणता येईल- अशी ही प्रत सध्या राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळेच्या माध्यमातून जतन केली जात आहे. काचेच्या पेटीत नायट्रोजन सोडण्यात येतो. घडय़ाळसदृश यंत्राच्या माध्यमातून काचेच्या पेटीत नायट्रोजनचा दबाव, आद्र्र्रता.. आदी तपासले जाते. जरा काही कमीजास्त झाले की, प्रयोगशाळेचे अधिकारी धावत-पळत येतात. एकेक कागद, त्यावर उमटलेला एकेक शब्द जतन केला जात आहे. एरव्ही सामान्यांना ही प्रत पाहता येत नाही. या प्रदर्शनीच्या निमित्ताने पाहता आली. हा ऐतिहासिक दस्तावेज आहे. प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हा दस्तावेज पुढील शंभर वर्षे जतन केला जाईल, म्हणजे साधारण २०९४ पर्यंत! प्रजासत्ताक भारतासोबत ही प्रत चिरायू ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पहिल्यांदा निवडून आलेल्या सुमारे पन्नासेक खासदारांनी या प्रदर्शनीस भेट दिली. प्रजासत्ताक भारताच्या निर्मितीची कहाणी जाणून घेतली. प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या आवाजातील चित्रफीत.. राज्यघटनेवरील सर्वात जुने म्हणजे १९२३, तर सर्वात नवे २०१२ मधील पुस्तक.. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन व कार्याचा परिचय देणारी हजारो पुस्तके यानिमित्ताने भेट देणाऱ्यांना पाहता आली.