आक्रस्ताळ्या विरोधासाठी प्रसिद्ध असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाच मंगळवारी राजधानी दिल्लीत आक्रमक आंदोलनाला सामोरे जावे लागले. या गदारोळात पश्चिम बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा यांना आंदोलकांनी धक्काबुक्की केली व त्यांचे कपडेही फाडले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या विरोधातच आदळआपट केली.
मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या विद्यार्थी शाखेचा (स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया) नेता सुदिप्तो घोष याचा गेल्या आठवडय़ात पोलीस कोठडीत मृत्यू झाला. सुदिप्तोच्या मृत्यूची चौकशी व्हावी यासाठी माकप व एसएफआयच्या १५० कार्यकर्त्यांनी मंगळवारी सकाळपासूनच नियोजन आयोगाच्या प्रवेशद्वारावर धरणे धरले होते. ममता बॅनर्जी व अमित मित्रा यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी ममताविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. ममतांनी गाडीतून बाहेर पडू नये, अशी सुरक्षारक्षकांनी केलेली विनंती झिडकारून ममता प्रवेशद्वाराकडे चालत्या झाल्या. आंदोलक विद्यार्थ्यांनी त्यांना घेराव घातला. मात्र, पोलिसांनी ममतांभोवती सुरक्षा कडे केल्याने त्या आयोगाच्या कार्यालयात पोहोचू शकल्या. त्यांच्या मागे आलेल्या अमित मित्रांना मात्र आंदोलकांनी धक्काबुक्की सुरू केली. त्यांचे कपडेही आंदोलकांनी फाडले. या सर्व गदारोळात सुरक्षारक्षकांनी मित्रांची कशीबशी सुटका केली. सुदिप्तोच्या मृत्यूची चौकशी होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इरादा आंदोलकांनी यावेळी जाहीर केला.
ममतांची आदळआपट
या सर्व प्रकाराने संतप्त झालेल्या ममतांनी त्यांचा सर्व राग नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष माँटेकसिंग अहलुवालिया आणि केंद्रीय नियोजन राज्यमंत्री राजीव शुक्ला यांच्यावर काढला. आंदोलन म्हणजे आपल्याविरोधातील षडयंत्र असून त्याला केंद्राची फूस आहे. बंगालचा विकास रोखण्यासाठीच असले प्रकार केले जात असल्याचा आरोपही ममतांनी केला. तसेच २२ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या संसदेचे कामकाज रोखून धरण्याचा इशाराही तृणमूलने दिला़