नासा या अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेने मंगळावर एकेकाळी पाणी वाहिल्याच्या खुणा सापडल्याचा निष्कर्ष जाहीर केला आहे. एरवी कोरडा व धुळीने माखलेला, जैवहीन ग्रह वाटत असलेल्या मंगळावर अजूनही काही प्रमाणात ओलसरपणा आहे असेही सांगण्यात आले. वैज्ञानिकांनी सोमवारी ही महत्त्वाची घोषणा केली असून त्यात आजही मंगळावर द्रव स्वरूपात पाणी असल्याचे म्हटले आहे, त्यामुळे तेथे सूक्ष्मजीवसृष्टीच्या शक्यतेला बळ मिळाले आहे. नासाच्या मार्स रेकनसान्स ऑर्बिटर यानावरील उच्च विवर्तने कॅमेऱ्याने टिपलेल्या छायाचित्रात पाणी वाहिल्याच्या खुणा दिसत आहेत. ‘नेचर जिओसायन्स’ या नियतकालिकातील शोधनिबंधात अ‍ॅरिझोना विद्यापीठाचे ग्रहीय भूगर्भशास्त्राचे प्राध्यापक आल्फ्रेड एस मॅकइवेन यांनी म्हटले आहे की, क्षारांचे निर्जलीकरण झाल्याचे दिसत असून ते क्षार म्हणजे पेरक्लोरेटस आहेत. तेथे आताही पाणी असल्याचा दावा करण्यात आला आहे.