वादातीत पुरावाअसल्याचा नेताजींचे चुलत नातू व संशोधक आशीष रॉय यांचा दावा

नेताजी सुभाषचंद्र बोस हे १८ ऑगस्ट १९४५ रोजी तैपैई (तैवान) येथे विमान अपघातात मरण पावल्याचे सिद्ध करणारा ‘वादातीत पुरावा’ आपल्याजवळ असल्याचा दावा नेताजींचे चुलत नातू व संशोधक आशीष रॉय यांनी रविवारी केला.

रेनकोजी मंदिरातील नेताजींच्या अस्थी भारतात परत आणल्या जाव्यात, अशी मागणी करून रॉय म्हणाले की, नेताजी हे १९४५ साली विमान अपघातात मरण पावले व त्यांना सोव्हिएत रशियात प्रवेश करण्याची संधी मिळाली नाही, हे स्पष्टपणे दर्शवणारे ३ अहवाल उपलब्ध आहेत.

नेताजी विमान अपघातात मरण पावल्याचे जपान सरकारच्या दोन अहवालांमध्ये स्पष्टपणे म्हटले असून, नेताजींना १९४५ मध्ये किंवा त्यानंतर तत्कालीन सोव्हिएत संघराज्यात प्रवेश करण्याची संधी न मिळाल्याचे नि:संदिग्धपणे सांगणारा अहवाल रशियाच्या सरकारी वास्तुसंग्रहालयात आहे. नेताजींना कधीही सोव्हिएत रशियात कैदी म्हणून ठेवण्यात आले नव्हते, असेही रॉय म्हणाले.

मात्र, कम्युनिस्ट राष्ट्र असलेला रशिया भारताला ब्रिटिश राजवटीपासून मुक्त करण्याच्या आपल्या कार्याला मदत करेल असे नेताजींना नेहमीच वाटत असे. त्यामुळे त्यांची रशियाला जाण्याची योजना असावी, असे मत रॉय यांनी व्यक्त केले. जपान शरण आलेला असल्यामुळे तो आपले संरक्षण करण्यास समर्थ राहणार नाही असे त्यांना वाटले. सोव्हिएत रशियामध्ये आपल्याला पकडले जाईल असे वाटत असले, तरी भारत स्वतंत्र करण्याच्या आपल्या मोहिमेबाबत आपण तेथील अधिकाऱ्यांची समजूत घालू शकू, असा त्यांना विश्वास होता, असेही रॉय म्हणाले.

या मुद्दय़ावर असलेल्या परस्परविरोधी मतांच्या संदर्भात रॉय म्हणाले की, नेताजींशी असलेली भावनिक बांधिलकी आपण समजू शकतो, मात्र सत्याला सामोरे जाण्याची गरज आहे. विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याकडे अंगुलिनिर्देश करणारा भरपूर पुरावा असतानाही किती दिवस आपण ते नाकारणार, असा प्रश्नही त्यांनी विचारला.