सुभाष वेलिंगकर यांचे टीकास्त्र; चुकीची धोरणे राबविणाऱ्यांना कसे पाठीशी घालणार?

भाजप एखादी चुकीची गोष्ट करते त्यावेळी संघ त्याचे समर्थन करतो. एक प्रकारे संघ भाजपला शरण गेल्याची स्थिती असल्याची खंत संघाचे बंडखोर नेते व गोवा सुरक्षा मंचचे प्रमुख कार्यकर्ते सुभाष वेलिंगकर यांनी व्यक्त केली. मी संघात राहीन मात्र आम्हाला असाह्य़ व कमकुवत नेतृत्व नको आहे असा टोला त्यांनी लगावला.

वेलिंगकर यांचा गोवा सुरक्षा मंच, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष व शिवसेना यांची युती गोवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजपला आव्हान देत आहे. त्या पाश्र्वभूमीवर इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या विशेष मुलाखतीत वेलिंगकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.  गोव्यात काँग्रेस सरकार असताना २०११ मध्ये आम्ही भाषा सुरक्षा मंच स्थापन करून चळवळ सुरू केल्याचे वेलिंगकर यांनी स्पष्ट केले. तत्कालीन काँग्रेस सरकारने २१ वर्षांचे धोरण मोडीत काढून खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला. स्थानिक भाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळांना अनुदान द्यावे अशी आमची भूमिका होती. त्यावेळी संघर्ष करून २०१२ मध्ये काँग्रेस सरकार आम्ही हटवले. त्यावेळी मनोहर पर्रिकर त्या धोरणाच्या विरोधात होते. मात्र भाजप सरकार सत्तेवर आल्यावर सत्तेसाठी व ख्रिश्चन समाजाचा अनुनय करण्यासाठी त्यांनी हेच धोरण सुरू ठेवले, असा आरोप वेलिंगकर यांनी केला.

सुरुवातीच्या काळात संघाने आमच्या भूमिकेला पाठिंबा दिला. २०१५ मध्ये अखिल भारतीय प्रतिनिधी सभेने मुलाला प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून द्यावे असा ठराव केला. निवडणुका जवळ येईपर्यंत सर्व काही सुरळीत होते. मात्र नंतर मला पत्रकार परिषदा घेऊ नका तसेच मनोहर पर्रिकर यांचे नाव घेऊ नका असे आदेश देण्यात आले. आमची भूमिका तत्त्वाची आहे. काँग्रेसविरोधात याच मुद्दय़ावर संघर्ष केला आहे. त्यावेळी तुम्ही विरोध केला नाहीत. मात्र आता भाजपविरोधात बोलल्यावर संघचालक पदावरून मला हटवण्यात आले. जेव्हा काँग्रेस चुकीचे वागते तेव्हा टीकास्त्र सोडता मात्र आपल्याच माणसांनी चुकीची धोरणे राबवल्यावर त्यांना पाठीशी कसे घालता, असा सवाल वेलिंगकर यांनी केला. संघात आम्ही तत्त्वं शिकलो, दुटप्पी भूमिका नाही असा टोला त्यांनी लगावला.

संघ बदलतोय काय, या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी गुहागर येथे एन्रॉन विरोधातील आंदोलनाचे उदाहरण दिले. संघाने सुरेंद्र थत्ते या कार्यकर्त्यांला पाठवले होते. नंतर मात्र निदर्शने थांबल्यावर त्यांना पद्धतशीरपणे बाजूला सारण्यात आल्याचे वेलिंगकर यांनी स्पष्ट केले. मी संघातून बाहेर पडलो नाही मात्र संघावर नियंत्रण ठेवू पाहणाऱ्यांचा आदेश धुडकावला. भाजप हा दलालांचा झाल्याचा आरोप त्यांनी केला. कोकण प्रांत संघचालक पदावरून वेलिंगकर यांना हटविण्यात आले होते.

आम्ही एकत्र

निकालानंतर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष भाजपबरोबर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र गोव्याची संस्कृती टिकवणे, स्थानिक भाषेचे महत्त्व या मुद्दय़ावर आम्ही एकत्र आहोत. गोव्यात आमचेच सरकार येईल. इंग्रजी माध्यमांच्या शाळांना अनुदान देणे थांबवणाऱ्यांनाच आमचा पाठिंबा असेल.