अयोध्येमध्ये राम मंदिराचे निर्माण व्हावे या करिता मुस्लिमांनी सहकार्य करावे असे आवाहन भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केले. भारतात केवळ एकच रामजन्मभूमी आहे. तर, मशीद हे प्रार्थनास्थळ आहे. ते कुठेही बांधता येऊ शकते असे स्वामी यांनी म्हटले. आज भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचा हौतात्म्य दिन होता. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भारतीय मुस्लिमांनी जर हिंदुंना सहकार्य केले तर चांगलेच आहे. जर, ते या कामात आमचे सहकार्य करू इच्छित नसतील तर २०१८ ला जेव्हा भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेत बहुमत येईल तेव्हा राम मंदिरासंदर्भात कायदा बनवला जाईल असे देखील ते म्हणाले.

विवादित जागा ही निःसंशय राम जन्मभूमीच आहे असे ते म्हणाले. त्या ठिकाणी हिंदू देवी देवतांच्या मूर्ती पुरातत्व विभागाला सापडल्या आहेत. मंदिर उद्धवस्त करुनच त्या जागी मशीद बांधण्यात आाली होती असे ते म्हणाले. मुस्लिमांनी शांततापूर्ण मार्गाने समस्या सोडवली तर त्यापेक्षा अधिक चांगली काय असू शकेल असे ते म्हणाले. मुस्लिमांनी सहकार्य करुन आम्हाला वाराणसी, मथुरा आणि अयोध्या या ठिकाणच्या विवादित जागा सोपवाव्या असे ते म्हणाले. त्यांच्या सहकार्याने आम्ही शांततापूर्ण मार्गाने आम्ही मंदिराचा निर्माण करू असे ते म्हणाले.

अयोध्येतील वादात बाबरी मशीद पाडली त्या ठिकाणी राम मंदिर बांधण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी हे पक्षकार आहेत.  राममंदिर उभारणीच्या मागणीवर न्यायालय त्यांच्या याचिकेची स्वतंत्र सुनावणी केली जाणार नाही असे न्यायालयाने आधीच स्पष्ट केले आहे. अयोध्येत राममंदिर उभारणी हा मूलभूत अधिकार असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. स्वामी यांनी असा दावा केला की, आधी तेथे मंदिर असल्याचे पुरावे असतील तर राम मंदिर उभारणीसाठी मार्ग सुकर करणारे प्रतिज्ञापत्र सरकारने आधीच दिले आहे. पुरातत्त्व विभागाने याबाबत तसे पुरावेही दिले आहेत.

नागरी अपिले प्रलंबित असताना स्वामी यांची याचिका वेगळी विचारात घेता येणार नाही, स्वामी यांनी एकतर उच्च न्यायालयात जावे किंवा आताच्या याचिकेबरोबर त्यांच्या याचिकेची सुनावणी मान्य करावी असे न्यायालयाने सांगितले होते. स्वामी यांनी याआधी सरन्यायाधीश टी. के. ठाकूर यांच्या पीठापुढे तातडीची सुनावणी करण्याची मागणी केली होती.  पवित्रतेच्या आधारावर मंदिर व मशीद यांची तुलना होऊ शकत नाही. मशीद हा इस्लाम धर्माचा अविभाज्य भाग नाही असे सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने म्हटले होते. रामजन्मभूमीच्या ठिकाणी राममंदिर होते व तेथे मशीद नव्हती, असे स्वामी यांचे म्हणणे आहे.