डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी यांची पंतप्रधानांकडे मागणी

भाजपचे वादग्रस्त खासदार डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी हे आता टाटा समूहाचे अध्वर्यू आणि टाटा सन्सचे हंगामी अध्यक्ष रतन टाटा यांच्यामागे हात धुऊन लागले आहेत. सीबीआय, सेबी आणि अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) रतन टाटांची संयुक्त चौकशी करण्याची मागणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शुक्रवारी केली. टाटांना वाचविण्याचा प्रयत्न न करण्याचा सूचनावजा इशाराही त्यांनी पंतप्रधानांना सूचकपणे दिला.

‘‘आतापर्यंतच्या अनेक व्यवहारांमध्ये टाटांनी चार गंभीर गुन्हे केले आहेत. तसे समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या कबुलीतूनही उघड झाले आहे. त्यामुळे कटकारस्थान (भारतीय दंड विधान कलम १२०८), सार्वजनिक निधीचा अपहार (कलम ४०३), फसवणूक (कलम ४१५) आणि गुन्हेगारी स्वरूपाचा विश्वासघात (४०५) या चार गंभीर गुन्हय़ांची चौकशी सीबीआय, सेबी आणि ‘ईडी’कडून झाली पाहिजे. या चौकशीमध्ये सरकारने कोणताही हस्तक्षेप करू नये आणि टाटांना वाचविण्याचा प्रयत्न करू नये,’’ असे स्वामींनी मोदींना लिहिलेल्या पत्रात स्पष्टपणे म्हटले आहे.

यापूर्वी स्वामींनी टाटा यांच्यावर टू जी स्पेक्ट्रम गैरव्यवहारातील सहभागाचा आरोप केला होता. त्याचबरोबर टाटांच्या ‘एअर एशिया’ आणि ‘विस्तारा’ या दोन विमान कंपन्यांना परवाना देताना आणि त्यांच्यातील भागीदारीमध्ये भारतीय कायद्यांचे धडधडीत उल्लंघन झाल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

टाटांवर नानाविध गंभीर आरोप करणाऱ्या सायरस मिस्त्री यांच्या स्फोटक पत्रानंतर तर स्वामींनी आणखीनच उचल खाल्ल्याचे दिसते आहे. मिस्त्री यांच्या हकालपट्टीनंतर स्वामींनी टाटा यांच्यावर व्यक्तिगत चिखलफेक केली होती.

‘रतन टाटा हे तर खरे टाटा नाहीत. त्यांचे वडील नवल यांना अनाथालयातून अपत्य नसलेल्या टाटांनी दत्तक घेतले होते. टू जी गैरव्यवहारात तर टाटा कुजलेले आहेत,’ असे ट्वीट त्यांनी केले होते.