भारत-पाकिस्तान यांच्या दरम्यान तणावाचे संबंध असताना पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यास बंदी घालणेच योग्य आहे, असे मत भाजपचे नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी व्यक्त केले.

‘इंडिया अँड पाकिस्तान अ सबकाँटिनेंटल अफेअर’ या विषयावरील परिषदेत त्यांनी सांगितले, की आगामी काळात युद्धाची शक्यता असल्याबाबत लोकांची मनाची तयारी करून घ्यावी अशी स्थिती आहे, पाकिस्तानशी आतापर्यंत चार युद्धे झाली असून युद्ध ही काही साधारण बाब नाही. त्यामुळे पाकिस्तानी चित्रपट कलाकार व क्रिकेटपटू यांना भारतात येऊ देणे योग्य ठरणार नाही, पाकिस्तानशी संबंध सुरळीत होतील, तेव्हा क्रिकेट व चित्रपट क्षेत्रातील संबंधही आपोआप सुरळीत होतील. युद्ध हे उत्तर नसले तरी नरेंद्र मोदी सरकार दहशतवाद सहन करणार नाही. दहशतवादी कारवाया केल्या, तर आम्हाला उपलब्ध साधनांच्या मदतीने आम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ.

 

बंदी घातलेल्या संघटनांच्या म्होरक्यांशी पाकिस्तानच्या अंतर्गतमंत्र्यांची चर्चा

इस्लामाबाद : अमेरिकेने दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या एका गटासह बंदी घालण्यात आलेल्या दोन गटांच्या म्होरक्यांची पाकिस्तानचे अंतर्गतमंत्री निसार अली खान यांनी भेट घेतल्याचे वृत्त आहे.

माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांनी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना पदच्युत करण्यासाठी पुढील आठवडय़ात आंदोलन करण्याचे जाहीर केले असून बंदी घातलेले गट त्यामध्ये सहभागी होतील, अशी भीती व्यक्त केली जात असल्याने निसार अली खान यांनी म्होरक्यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. तहरिक-ए-इन्साफ पक्षाचे नेते इम्रान खान यांनी २ नोव्हेंबर रोजी इस्लामाबाद बंदचा इशारा दिला आहे. तालिबानचे गॉडफादर म्हणून ओळखले जाणारे मौलाना समिऊल हक यांनी आपला डिफ्श-ए-पाकिस्तान कौन्सिल हा पक्ष इम्रान खान यांनी पुकारलेल्या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे जाहीर केल्याने सरकारमध्ये भीतीचे वातावरण आहे.