नॅशनल हेराल्ड गैरव्यवहार प्रकरणाची सुनावणी २६ डिसेंबर रोजी होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करुन नॅशनल हेराल्डची संपत्ती हडपण्याचा प्रयत्न केला अशी याचिका भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी टाकली होती. त्याबाबत न्यायालयाने काल आपला आदेश राखत सुनावणी २६ डिसेंबर रोजी पुढे ढकलली आहे.

या प्रकरणाची शहानिशा होण्यासाठी नॅशनल हेराल्ड ज्या कंपनीच्या मालकीचे आहे त्या असोसिएटेड जर्नल लिमिटेडच्या कागदपत्रांची आणि अकाउंट बुक्सची तपासणी व्हावी अशी याचिका स्वामी यांनी टाकली होती. ही कागदपत्रे मिळाल्यावर हे प्रकरण स्पष्ट होईल असे स्वामी यांनी म्हटले होते. त्यासंदर्भातील निकाल राखून ठेवत न्यायालयाने सुनावणी २६ डिसेंबर रोजी ठेवली आहे. पटियाला हाउसचे मॅजिस्ट्रेट लवलीन यांनी दोन्ही पक्षाच्या वकिलांचे म्हणणे ऐकून हा निकाल २६ तारखेपर्यंत राखून ठेवला आहे.

असोसिएटेड जर्नल लिमिटेडला कागदपत्रे मागण्याचे अधिकार स्वामी यांच्याकडे नाहीत. कागदपत्रे मिळवून त्यातील काही चुका शोधून नवीन केस टाकण्याच्या कामासाठी स्वामी यांना कागदपत्रे हवी असल्याचे बचाव पक्षाच्या वकिलांनी म्हटले.

या प्रकरणात काँग्रेसच्या अन्य नेत्यांची नावे देखील गुंतलेली आहेत. मोतीलाल व्होरा, सुमन दुबे, सॅम पित्रोदा आणि ऑस्कर फर्नांडिस यांचीदेखील नावे या प्रकरणाशी जोडली गेलेली आहेत.

काय आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण ?

भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. आपल्या पक्षाचे मुखपत्र असावे म्हणून जवाहरलाल नेहरू यांनी नॅशनल हेराल्ड सुरू केले. या वृत्तपत्र समूहाला त्यांनी नाव दिले असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड(एजेएल). या वृत्तपत्राचे सर्व भागीदार हे काँग्रेसचे नेते अथवा कार्यकर्तेच होते. २००८ मध्ये या वृत्तपत्र समुहाने आपली सर्व प्रकाशने थांबवली.

नॅशनल हेराल्ड हे दैनिक तसेच कौमी आवाज हे उर्दू दैनिकही छापणे बंद करण्यात आले. वृत्तपत्र कधी चालले नसले तरी एजेएल या समुहाची स्थावर मालमत्ता प्रचंड होती. दिल्ली, लखनौ, पाटणा, मुंबई आणि चंडीगड येथील स्थावर मालमत्तेची जर एकत्र किंमत विचारात घेतली तर ती पाच हजार कोटींच्या वर जाईल.

राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी यंग इंडिया नावाच्या कंपनीची स्थापना केली. यंग इंडियाकडून एजेएलला ९० कोटींचे कर्ज मिळाले. यंग इंडियामध्ये राहुल आणि सोनियांचे प्रत्येक ३८ टक्के समभाग आहेत.

१९३८ साली जेव्हा एजेएलची स्थापना करण्यात आली तेव्हा ती कॉर्पोरेट कंपनी होती. परंतु, १९५६ मध्ये ही कंपनी नॉन प्रॉफिट ऑर्गनायजेशनमध्ये बदलण्यात आली. यामुळे या कंपनीला कर भरण्यातून सुट मिळाली. तसे झाले तरी या वृत्तपत्राचा खप मुळातच नव्हता. तेव्हा एजेएल घाट्यातच जाणार हे उघड होते.

जेव्हा हे कर्ज परत देणे अवघड बनले तेव्हा ५० लाख रुपयांच्या व्यवहारावर नॅशनल हेराल्ड ट्रस्टने आपले सर्व अधिकार आणि संपत्ती यंग इंडिया लि. च्या नावावर केली. त्यावेळी काँग्रेसचे कोषाध्यक्ष मोतीलाल व्होरा हे एजेएलचे अध्यक्ष होते.

आपले राजकीय वजन वापरुन गांधी परिवाराने हजारो कोटींची मालमत्ता आपल्या नावे अधिकृतरित्या करुन घेतल्याचा आरोप सुब्रमण्यम स्वामींनी केलेला आहे.