‘ऑगस्टा’प्रकरणावरून राज्यसभेत काँग्रेस सदस्यांचा हल्लाबोल

हेलिकॉप्टर खरेदी करारावरून बुधवारी राज्यसभेत झालेल्या चर्चेनंतर गुरुवारी काँग्रेसने भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. डॉ. स्वामी यांना ईडी आणि सीबीआयच्या संवेदनक्षम गोपनीय फायली कशा मिळाल्या आणि त्यांनी उल्लेख केलेल्या तो दस्तऐवज प्रमाणित करून त्यानंतर सभागृहात मांडला आहे का, असा सवाल काँग्रेसच्या सदस्यांनी केला.

याबाबत काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. सीबीआय आणि ईडीच्या संवेदनक्षम गोपनीय फायलींचा उल्लेख डॉ. स्वामी यांनी सभागृहात बुधवारी केला. हा गोपनीय दस्तऐवज डॉ. स्वामी यांना कसा मिळाला ते सभागृहाला कळलेच पाहिजे, तो दस्तऐवज प्रमाणित करून त्यांनी सभागृहात मांडला आहे का, कारण त्यांनी दस्तऐवज प्रमाणित करण्यास नकार दिला आहे, असे शर्मा म्हणाले.

काँग्रेसच्या सदस्यांनी अधिक आक्षेप घेताच संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले की, डॉ. स्वामी यांनी दस्तऐवज प्रमाणित करून तो सभागृहात मांडला आहे. त्यानंतर डॉ. स्वामी यांनी सादर केलेला दस्तऐवज प्रमाणित केला आहे का, असा सवाल काँग्रेसचे जयराम रमेश यांनी केला. त्या दस्तऐवजाची आपण तपासणी करू, असे कुरियन म्हणाले.

यासाठी किती कालावधी लागेल, डॉ. स्वामी यांचे वक्तव्य कामकाजातून काढून टाकणार का, ते वक्तव्य यूटय़ूबवरून काढणार का, कारण डॉ. स्वामी यांनी ती अद्याप प्रमाणित केलेली नाहीत.

उपसभापतींचा आदेश

डॉ. स्वामी यांनी ज्या दस्तऐवजाचा उल्लेख केला आहे त्याची त्यांनी खातरजमा करूनच तो सभागृहात मांडला आहे का हे स्पष्ट करावे, असा आदेश उपसभापती पी. जे. कुरियन यांनी दिला. त्या आदेशांचे पालन डॉ. स्वामी यांनी न केल्यास नियमाप्रमाणे कारवाई होईल, असे कुरियन म्हणाले. आदेशाचे पालन झालेच पाहिजे, असे कुरियन यांनी ठणकावले