भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी शुक्रवारी बलात्कार प्रकरणात आरोपी असलेले स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांची जोधपूरमधील कारागृहात भेट घेतली. आसाराम बापू यांना जामीन मिळवून देण्यासाठी त्यांच्या बाजूने न्यायालयात लढणार असल्याचे सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितले.
जामीन मिळणे हा आसाराम बापूंचा अधिकार आहे. त्यामुळेच त्यांना जामीन मिळवून देण्यासाठी मी त्याच्यावतीने न्यायालयात लढणार आहे, असे स्वामी यांनी सांगितले. दोषी ठरविल्यानंतरही लालूप्रसाद यादव आणि जयललिता यांना न्यायालयाकडून जामीन मिळू शकतो, तर आसाराम बापूंना जामीन का मिळू शकणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
गेल्याच महिन्यात गुजरात उच्च न्यायालयाने आसाराम बापूंचा तात्पुरता जामिनासाठीचा अर्ज फेटाळला होता. त्याआधी गांधीनगरमधील न्यायालयानेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.