रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांची तातडीने पदावरून उचलबांगडी करावी, या मागणीसाठी भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. राजन आपल्या धोरणांनी जाणीवपूर्वक देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान करीत असल्याचा गंभीर आरोप स्वामी यांनी पत्रामध्ये केला आहे. त्याचबरोबर राजन हे मनापासून भारतीय नसून केवळ ग्रीनकार्डधारक म्हणून ते देशात वास्तव्यास आहेत, असेही स्वामी यांनी म्हटले आहे. ‘एनडीटीव्ही’ने या संदर्भातील वृत्त प्रसारित केले आहे.
काही दिवसांपूर्वीच संसदभवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना स्वामी यांनी राजन यांना पुन्हा शिकागोला पाठविण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता त्याने थेट पंतप्रधानांनाच या संदर्भात पत्र लिहिले आहे. रघुराम राजन हे भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्याचे प्रयत्न करण्याऐवजी स्थिती आणखी कशी बिघडेल, यासाठीच काम करीत आहेत. राजन यांच्या जाणीवपूर्वक असे वागण्यामुळे मला धक्काच बसला आहे, असे स्वामी यांनी म्हटले आहे.
गव्हर्नरच्या कृतींमुळे औद्योगिक उपक्रम कोलमडले आणि अर्थव्यवस्थेत बेरोजगारी वाढली, त्यामुळे त्यांना शक्य तितक्या लवकर शिकागोला पाठविणे उचित ठरेल, असे डॉ. स्वामी म्हणाले. राजन हे शिकागोतील बूथ स्कूल ऑफ बिझनेसमध्ये अर्थविषयाचे प्राध्यापक होते.