सहारा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांना झालेली अटक धक्कादायक असून मूळात ते सच्चे देशप्रेमी असल्याचे मत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपील देव यांनी व्यक्त केले आहे.
कपील देव यांनी पत्राद्वारे माध्यमांशी संवाद साधला यात ते म्हणतात की, मी बांगलादेशात असताना एका वृत्तवाहिनीवर रॉय यांच्या अटक झाल्याचे वृत्त समजले. मी त्यांना ओळखतो ते सच्चे देशभक्त असून त्यांनी आजवर देशासाठी खूप काही केले आहे. अशा कठीण परिस्थितीतून ते लवकरच बाहेर पडतील अशी मला आशा आहे. असेही कपील देव म्हणाले. तसेच रॉय यांच्या अटकेत्या वृत्तानंतर त्यांना व त्यांच्या पत्नीला सातत्याने संपर्क करण्याचा मी प्रयत्न केला. परंतु, संपर्क न झाल्याने सहारा समूहाच्या वरिष्ठ अधिकाऱयांशी माझे बोलणे झाले. सहारा कर्मचाऱय़ांच्या मनात रॉय यांचे स्थान देवाप्रमाणे असून या घटनेमुळे समूहातील कर्मचाऱयांवर विपरीत परिणा होऊ शकतो अशी चिंताही कपिल यांनी पत्रातून व्यक्त केली.
तवणूकदारांचे पैसे परत करण्याच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी रॉय यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. गेल्या शुक्रवारी रॉय यांनी लखनौमध्ये पोलीसांपुढे शरणागती पत्करल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. पोलीस बंदोबस्तातच रॉय यांना सोमवारी संध्याकाळी लखनौहून गाडीने दिल्लीला आणण्यात आले. आज (मंगळवार) रॉय यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.