अनुदानित दराने घेता येऊ शकणाऱ्या सिलिंडरचा कोटा पूर्ण झाला की सामान्यांना बाजारभावानुसार स्वयंपाकाचा गॅस खरेदी करावा लागतो. त्यामुळे पडणारा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी केंद्र सरकारने आता पाच किलो वजनाचे ३४ सिलिंडर वर्षभरासाठी स्वस्तात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
आतापर्यंत घरगुती गॅसग्राहकांना स्वयंपाकाच्या गॅसचे १४.२ किलो वजनाचे सिलिंडर उपलब्ध होते. वर्षांला १२ सिलिंडर अनुदानित दराने वितरित होतात. मात्र, त्यापुढील सिलिंडरची खरेदी बाजारभावानुसार करावी लागते. दिल्लीत अनुदानित सिलिंडरची किंमत ४१७ रुपये आहे. तर अन्य ठिकाणी त्याची किंमत विभिन्न आहे. मात्र, अनुदानित सिलिंडरचा कोटा पूर्ण झाल्यानंतर खरेदी करावा लागणारा सिलिंडर खर्चीक असतो. त्यामुळे आर्थिक बोजा पडतो. या पाश्र्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी प्रत्येक ग्राहकाला पाच किलो वजनाचे ३४ सिलिंडर देण्याची तयारी दर्शवली आहे. वर्षभरासाठी हे पाच किलो वजनाचे ३४ सिलिंडर १५५ रुपयांना उपलब्ध असतील. मात्र, त्यानंतर त्यांची किंमत ३५१ रुपये असेल. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कमी उत्पन्न गटातील लोकांना दिलासा मिळणार आहे. फक्त ही सेवा घेताना नोंदणीकृत ग्राहकांना वर्षांच्या सुरुवातीलाच पाच किलोचे सिलिंडर हवेत की १४.२ किलोचे हवेत हा पर्याय निवडावा लागेल. या सिलिंडरवर अनुदान दिल्याने १४.२ किलोच्या सिलिंडरवरील अनुदान रद्द केले जाणार नाही. केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेद्र प्रधान यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना ही माहिती दिली.