देशात विकसित झालेल्या आणि जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या ‘पृथ्वी-२’ या अण्वस्त्र- सक्षम (न्यूक्लिअर कॅपेबल) क्षेपणास्त्राची आज ओदिशातील चांदीपूर चाचणी क्षेत्रात यशस्वी चाचणी घेण्यात आली.
येथील एकात्मिक चाचणी क्षेत्र (इंटिग्रेटेड टेस्ट रेंज) येथे सकाळी ९.२० वाजता एका मोबाइल लाँचरवरून क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. साडेतीनशे किलोमीटर अंतरावर मारा करू शकणाऱ्या ‘पृथ्वी-२’ ची ५०० ते १ हजार किलोग्रॅम वजनाचे अण्वस्त्र (वॉरहेड) वाहून नेण्याची क्षमता असून, दोन टप्प्यांच्या या क्षेपणास्त्राला द्रवरूप इंधन असलेल्या इंजिनच्या मदतीने गती देण्यात आली.
‘स्ट्रॅटेजिक फोर्स कमांड’ (एसएफसी)ने घेतलेली या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाल्याचे आयटीआरचे संचालक एमव्हीकेव्ही प्रसाद यांनी सांगितले. प्रशिक्षणाचा भाग असलेल्या क्षेपणास्त्र प्रक्षेपणाचे काम खासकरून गठित करण्यात आलेल्या एसएफसीने केले, तर संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) शास्त्रज्ञांनी त्यावर देखरेख ठेवली, असे संरक्षणविषयक एका शास्त्रज्ञाने सांगितले.
२००३ साली भारताच्या ‘स्ट्रॅटेजिक फोर्स कमांड’ मध्ये समाविष्ट करण्यात आलेले ‘पृथ्वी-२’ हे भारताच्या प्रतिष्ठित अशा एकात्मिक दिशादर्शित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमांतर्गत (आयजीएमडीपी) डीआरडीओने विकसित केलेले पहिले क्षेपणास्त्र असल्याचे संरक्षण खात्याच्या सूत्रांनी सांगितले. या क्षेपणास्त्राची यापूर्वीची चाचणी याच टेस्ट रेंजमध्ये १४ नोव्हेंबर २०१४ रोजी घेण्यात आली होती.
त्याची ही आवृत्ती या वर्षांत लष्करात दाखल करण्यात आली आहे.