पुढील महिन्यात इजिप्तच्या सुएझ कालव्यातील सुएझ कॅनॉल अ‍ॅक्सिस असे नाव असलेल्या नव्या शिपिंग मार्गाचे उद्घाटन होणार असून या पाश्र्वभूमीवर अधिकाऱ्यांनी या कालव्याचे नवा सुएझ कालवा असे वर्णन केले आहे. नव्या शिपिंग मार्गामुळे इजिप्तच्या विकासातील महत्त्वाचा दुवा ठरू पाहणारा हा कालवा नव्या मोहिमेसाठी सज्ज झाला आहे.
इजिप्तमधील जलवाहतुकीचा वेग वाढावा तसेच महसूलात वाढ व्हावी यासाठी ७२ कि.मी अंतराचा हा नवा मार्ग तयार करण्यात आला आहे. हा मार्ग जुन्या कालव्या जवळून जाणार असून तो लाल समुद्राशी जोडण्यात आला आहे.
काही नौकांनी या नव्या सुएझ कालव्यातून प्रवास केल्यामुळे कालव्याची पहिली चाचणी यशस्वीपणे पार पडल्याचे मेना या वृत्तसंस्थेने स्पष्ट केले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सहा छोटय़ा नौका असलेल्या दोन मोठय़ा नौकांनी या मार्गाने प्रवास करताना पहिली चाचणी पूर्ण केली.