गणरायाचे आगमन अवघ्या आठवडय़ावर आले असतानाच सरकारने साखरेवरील आयात शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल १० टक्क्यांनी ही वाढ केल्यामुळे आयात शुल्क १५ टक्क्यांवरून २५ टक्क्यांवर गेले आहे. मात्र यामुळे साखरेचे भाव ऐन सणासुदीच्या काळात वाढण्याची चिन्हे आहेत.
साखर कारखाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ६८०० कोटी रुपये देणे लागतात. आयात शुल्कातील वाढीमुळे साखर आयात करणे अवघड होईल व त्यामुळे एतद्देशीय साखरेचे भाव वाढतील. त्याचा बोजा ग्राहकांवर पडला तरी साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती मात्र सुधारेल. आणि त्यातून शेतकऱ्यांची देणी देता येतील, असा सरकारचा होरा आहे. लोकहितासाठीच हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
अन्न मंत्रालयाने साखरेवरील आयात शुल्क ४० टक्के करण्याची सूचना केली होती, पण अर्थ मंत्रालयाने ते मध्यम प्रमाणात वाढवले आहे. अर्थमंत्र्यांनी दरवाढीचा धोका लक्षात घेऊनही देशांतर्गत साखर कारखान्यांना दिलासा दिला आहे, असे अन्न मंत्रालयाचे म्हणणे आहे.

सध्या देशांतर्गत साखरेचे दर किलोला ३४-४० रु. दरम्यान आहेत. अतिरिक्त साखर साठय़ामुळे साखर कारखान्यांचा नफा कमी झाला आहे. महाराष्ट्रात साखरेचे दर किलोला २८ रु. ५० पैसे असून साखरेची उत्पादन किंमत ३१ रुपये आहे. भारतीय साखर महासंघाने या निर्णयाचे स्वागत केले असून त्यामुळे कारखाने शेतकऱ्यांची देणी देऊ शकतील असे म्हटले आहे.