काबूलमधील न्याय मंत्रालयाच्या इमारतीमध्ये झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटात मंगळवारी दुपारी सहा जण ठार झाले. बॉम्बस्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती की त्यामुळे इमारतीच्या कांचांचा चुरा झाला. ४२ जण या स्फोटात जखमी झाले असून, त्यांना उपचारांसाठी आसपासच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
न्याय मंत्रालयाच्या इमारतीमधील वाहनतळामध्ये स्फोटकांनी भरलेली कार लावण्यात आली होती आणि याच कारचा स्फोट घडवून आणण्यात आला, अशी माहिती अफगाणिस्तानचे गृहमंत्री सेदिक सिद्दीकी यांनी दिली. मंत्रालयात काम करणारे कर्मचारी काम आटपून घरी निघाले असतानाच दुपारी चारच्या सुमारास हा स्फोट घडवून आणण्यात आला. काबूल शहरातील अत्यंत वर्दळीच्या भागात न्याय विभागाची ही इमारत आहे. इमारतीच्या आजूबाजूला अनेक इमारती असून, काही दुकानेही आहेत. या स्फोटामुळे काही दुकानांचेही नुकसान झाले आहे. कोणत्याही दहशतवादी संघटनेनी या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. एका आठवड्याच्या काळात काबूलमध्ये झालेला हा तिसरा स्फोट आहे.
(संग्रहित छायाचित्र)