‘सूटकेस’पेक्षा ‘सूट-बूट’ केव्हाही स्वीकारार्हच या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना टोला मारला आहे.
एका वृत्तपत्राला दिलेल्या विस्तृत मुलाखतीत मोदी यांनी जमीन अधिग्रहण, ‘सूट-बूट’ आदी मुद्दय़ांना उत्तरे दिली. काँग्रेसला तब्बल ६० वर्षांनंतर आता गरिबांची आठवण झाली आहे. पण काँग्रेसच्याच संकुचित धोरणांमुळे या देशातले लोक गरीब राहिले. त्यामुळे ‘सूटकेस’ पेक्षा ‘सूट-बूट’ केव्हाही स्वीकारार्हच ठरेल, या शब्दांत मोदी यांनी राहुलसह काँग्रेसवरही टीकेची तोफ डागली. आपले म्हणणे अधिक स्पष्ट करताना मोदी यांनी कोळसा खाण घोटाळा, टूजी स्पेक्ट्रम घोटाळा किंवा राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा आदींमुळे गरीबांचा कोणता फायदा झाला, अशी काँग्रेसला विचारणा केली. या सर्व घोटाळ्यांमधून कोणाचा कसा फायदा झाला, हे प्रत्येकाला ठाऊक आहे, याकडेही मोदी यांनी लक्ष वेधले.
विरोध अन्याय्य
वादग्रस्त ठरलेले जमीन अधिग्रहण विधेयक आपल्यासाठी जीवनमरणाचा मुद्दा नाही किंवा आपल्या पक्षाचाही अजेंडा नाही. त्यावर कोणतीही सूचना स्वीकारण्यास आपण तयार आहोत. जमीन अधिग्रहण विधेयकास होणारा विरोध अन्याय्य आणि दुर्दैवीही असून सरकारने त्याद्वारे खासगी उद्योगासाठी कोणतेही बदल केलेले नाहीत, असे मोदी यांनी स्पष्ट केले. या विधेयकात केलेले बदल राज्य सरकारांनी केलेल्या मागणीला अनुसरूनच केले. या विधेयकात करण्यात आलेले बदल ग्रामीण भागातील गरिबांचा फायदा होईल, अशाच पद्धतीने केले असून पाटबंधारे, गृहबांधणी, विद्युतीकरण आदी मुद्दे विचारात घेऊन केले असल्याचे मोदी म्हणाले.
लष्करातील ‘एक पद-एक निवृत्तीवेतन’ वादासंबंधीही पंतप्रधानांनी भाष्य केले. याची अंमलबजावणी करण्यास आपण बांधील आहोत. मात्र, संरक्षण विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्याचा तपशील ठरवावा लागेल, असे त्यांनी सांगितले.
आपले सरकार सर्वाशी विचारविनिमय करूनच काम करीत असून विकासाच्या मुद्दय़ावर कोणत्याही प्रकारे प्रतिष्ठेचा मुद्दा करीत नाही, असा दावा मोदी यांनी केला.