लोकांसमोर मोठ मोठ्याने बोलणे सोपे असते. पण एखाद्याचे म्हणणे संयमाने ऐकून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. मात्र, याचाच अभाव सध्याचा सरकारमध्ये असल्याचे अनेक गोष्टींतून दिसून येते, अशा शब्दांत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नाव न घेता टीका केली. बंगळुरूतील माऊंट कार्मेल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना राहुल बोलत होते.

एखाद्याला आक्षेप किंवा समस्या असल्यास त्याबाबतीत त्याच्याशी बोलण्याचा आणि त्याचे म्हणणे ऐकून घेण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असते. केवळ टीकाबाजी करून विषयाला बगल देणे हा समस्येवरील तोडगा ठरू शकत नाही. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चेची आवश्यकता असताना ते स्वत:हून विरोधकांना चर्चेसाठी बोलवत असत. पण, मोदींनी असे आतापर्यंत एकदाही केले नाही, असे राहुल म्हणाले. तसेच देशातील युवा पिढीला रोजगार उपलब्ध होत नाही. मग हे सूटा-बुटांचे सरकार काय कामाचे? असा सवाल देखील राहुल यांनी उपस्थित केला.

अच्छेदिनाचे स्वप्न दाखवणारे हे सरकार सर्वच पातळीवर नापास ठरत असल्याचे संपूर्ण जग पाहात आहे. सरकारमध्ये प्रत्येक निर्णय एकच व्यक्तीच घेत आहे. पण, देशातील समस्यांवर या व्यक्तीकडे उत्तरे नाहीत, असा टोला देखील राहुल यांनी मोदींना लगावला. संसदेचे कामकाज बंद पडावे, असे आम्हालाही वाटत नाही पण, देशातील प्रत्येकासाठी योग्य ठरेल असे जीएसटी विधेयक लागू करण्यात यावे ही आमची भूमिका असून त्यावर चर्चेसाठी तयार असल्याचेही राहुल पुढे म्हणाले.