छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील नक्षलवादी हल्ल्यानंतर पोलिसांनी नक्षलवाद्यांविरोधातील मोहिम तीव्र केली आहे. या मोहिमेंतर्गत सुकमामध्ये सक्रिय असलेल्या मोस्ट वॉन्टेड नक्षलवाद्यांचे पोस्टर प्रसिद्ध केले असून ते ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. पोस्टरवर ‘मोस्ट वॉन्टेड’ नक्षलवाद्यांची छायाचित्रे छापण्यात आली असून, त्यांना पकडणाऱ्या अथवा त्यासाठी मदत करणाऱ्या व्यक्तींना लाखोंची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. ३ ते ४० लाखांपर्यंत बक्षीस ठेवण्यात आले आहे. नक्षलवाद्यांबाबत माहिती देणाऱ्यांची नावे गुप्त ठेवण्यात येणार आहेत, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या पोस्टरवर काही पोलीस अधिकाऱ्यांची नावे देण्यात आली असून त्यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोस्ट वॉन्टेड नक्षलवाद्यांमध्ये रामन्ना उर्फ संतोष रावुला श्रीनिवास याचे नाव सर्वात आघाडीवर आहे. त्याला पकडण्यासाठी मदत करणाऱ्या व्यक्तीला ४० लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे. आंध्र प्रदेशचा असलेला रामन्ना माओवाद्यांच्या सेंट्रल कमिटीचा सदस्य असून दंडकारण्य विशेष विभागीय समितीचाही सदस्य आहे. परिसरात त्याची प्रचंड दहशत असल्याचे बोलले जाते. तर सुरेंद्र उर्फ माडवी सीमा या नक्षलवाद्यावर १० लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. रघु, मडकामी सोजा, बारसे, सोमा सोढी आदी नावांनीही ओळखले जाते. पोलिसांच्या माहितीनुसार, माडवी दरभा विभागीय समितीचा सचिव आहे. तो सुकमा जिल्ह्यातील गोलापल्ली परिसरातील पोलमपाट गावचा रहिवासी आहे. वनोजा या ३० वर्षांच्या महिला नक्षलवाद्यावरही ८ लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. वनोजा नक्षलवाद्यांच्या एका गटाची कमांडर आहे. आंध्र प्रदेशातील चिन्नाबोडकेल गावची रहिवासी आहे. आपल्याजवळ कायम एके ४७ बाळगणाऱ्या वनोजावर अनेक हल्ल्यांमध्ये सामील होण्याचा आरोप आहे. मोस्ट वॉन्टेडच्या यादीत आणखी एका महिलेचा समावेश आहे. सोडी लिंगे असे तिचे नाव आहे. पामेड पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील जारापल्ली गावची ती रहिवासी आहे. तिच्यावर पाच लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. माडवी मंगली असे आणखी एका महिला नक्षलवाद्याचे नाव आहे. नक्षलवाद्यांच्या सेक्शन २ च्या तुकडी क्रमांक ८ची ती कमांडर आहे. मंगलीचा पती राजेश नक्षल्यांच्या मिलिटरी विंगचा प्रमुख आहे. तिच्यावर तीन लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.