छत्तीसगडमधील सुकमामधील नक्षली हल्ल्यानंतर देशातील नक्षलवादाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नक्षलग्रस्त भागात काम करण्यापेक्षा जम्मू काश्मीरमध्ये काम करणे सोपे असते अशा शब्दात एका जवानाने भावना व्यक्त केल्या आहेत. तर माझा मुलगा आपल्याच लोकांशी लढताना शहीद झाला हे बघून वाईट वाटते अशी खंत शहीद जवानाच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.

सुकमामध्ये सोमवारी नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या तुकडीवर केलेल्या हल्ल्यात २५ हून अधिक जवान शहीद झाले होते. या हल्ल्यातील जखमी जवानांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी संवाद साधला. नक्षलवाद्यांची संख्या आमच्या पेक्षा खूप जास्त होती. आमच्याकडे पुरेसा शस्त्रसाठाही नव्हता. दोन तासांच्या चकमकीनंतरच आम्हाला वास्तवाची जाणीव झाली होती. नक्षलविरोधी मोहीमेपेक्षा जम्मू काश्मीरमध्ये काम करणे सोपे असते अशी प्रतिक्रिया या जवानाने दिली.

चकमकीचा घटनाक्रम सांगताना जवान म्हणतो, नक्षलवाद्यांची संख्या जास्त होती. त्यांच्याकडे एके ४७ तसेच ग्रेनेड लाँचरही होते. याशिवाय हँड ग्रेनेडनेही आमच्यावर हल्ला होत होता असे त्या जवानाने सांगितले. नक्षलवाद्यांकड़ून सातत्याने गोळीबार होत असल्याने आम्हाला मृत्यू झालेल्या जवानांकडील बंदूक घेणेही कठीण झाले होते असे त्या जवानाने सांगितले. काही नक्षलवाद्यांकडे एसएलआर आणि अन्य स्वयंचलित शस्त्रे होती. नक्षलवाद्यांनी गावकऱ्यांना प्रथम ठिकाणाची पाहणी करण्यासाठी पाठविले, गावकऱ्यांकडे शस्त्रे नव्हती, त्यामुळे आम्ही त्यांच्यावर गोळीबार कसा करणार. मात्र आम्हीही प्रत्युत्तर दिले असे या जवानांनी नमूद केले.

सुकमामधील हल्ल्यात शहीद झालेला सीआरपीएफचा जवान अभय मिश्राच्या कुटुंबानेही या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. अभय हे बिहारचे रहिवासी होती. अभय यांचे वडील गजेंद्र मिश्रा म्हणाले, माझा मुलगा सीमारेषेवर शत्रूंशी लढताना शहीद झाला असता तर मला अभिमान वाटला असता. पण त्याला आपल्यांशी लढतानाच त्याला प्राण गमवावे लागले असे त्यांनी सांगितले.