राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रचारक सुनील जोशी यांच्या हत्येप्रकरणी मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केलेल्या साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्यावर खटला भरवण्यास राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) नकार दिला आहे.
मध्य प्रदेश पोलिसांनी याप्रकरणी चुकीच्या व्यक्तींना अटक केली असून, या प्रकरणाचा तपास नव्याने सुरू केला पाहिजे, असे एनआयएकडून सांगण्यात आले. सुनील जोशी हे साध्वी प्रज्ञासिंग यांच्याप्रमाणेच मालेगाव, समझौता एक्स्प्रेस आणि अजमेर बॉम्बस्फोट प्रकरणांतील आरोपी होते. मात्र २००७मध्ये ते देवस येथे मृतावस्थेत आढळले होते.
साध्वी प्रज्ञासिंग यांनीच त्यांची हत्या केल्याचा आरोप मध्य प्रदेश पोलिसांनी केला होता. मात्र एनआयएने हा आरोप खोडून काढला. समझौता एक्स्प्रेस बॉम्बस्फोट प्रकरणातील सहआरोपी लोकेश शर्मा आणि राजेंदर पेहलवान यांनीच सुनील जोशी यांची हत्या केली आहे, असे एनआयएने सांगितले.
समझौता एक्स्प्रेस बॉम्बस्फोट प्रकरणी नुकतेच महू येथून भाजपचे युवा नेते असलेल्या दिलीप जगताप आणि जितेंदर शर्मा यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीतून ही हत्या शर्मा व पेहलवान यांनी केल्याचे सिद्ध झाले.