जातीय राजकारण व घराणेशाहीला नाकारून उत्तर प्रदेशात विकासाच्या राजकारणाला चालना द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील सभेत केले. निधीच्या वापरावरून उत्तर प्रदेश सरकारवर टीका करताना, गुजरातमध्ये दलितांना झालेली मारहाण किंवा मायावतींच्या विरोधातील भाजपच्या माजी प्रदेश उपाध्यक्षाचे वक्तव्य याबाबत भाष्य करण्याचे टाळले.

गोरखपूरमध्ये अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था(एम्स)चा कोनशिला समारंभ तसेच बंद पडलेला खत कारखाना पुन्हा सुरू करण्याची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आली. यातून चार हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत. राष्ट्रीय खत महामंडळाचा हा प्रकल्प १९९० पासून बंद आहे. सहा हजार कोटींची गुंतवणूक करून तो सुरू केला जाणार आहे.  या कार्यक्रमांच्या निमित्ताने पंतप्रधानांच्या सभेद्वारे भाजपने शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. केंद्राने आरोग्य क्षेत्रासाठी दिलेला निधी उत्तर प्रदेश सरकारने खर्च केला नसल्याची टीका मोदींनी केली. सात हजार कोटींपैकी केवळ २८५० कोटी रुपयेच खर्च केल्याचे पंतप्रधानांनी निदर्शनास आणले. त्यामुळे गतीने काम करणारे सरकार निवडून आणा असे आवाहन त्यांनी सभेत केले.  खत प्रकल्प पुन्हा सुरू केल्याने गोरखपूरमधील उद्योगांना चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पूर्व उत्तर प्रदेशात औद्योगिक विकास यातून सुरू होईल, असे पंतप्रधानांनी सांगितले.

आधुनिक भारतासाठी काम करा

धार्मिक नेत्यांनी आधुनिक भारताच्या उभारणीत योगदान द्यावे, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. अनेक जण सामाजिक कार्यात अग्रसर असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. महंत अवैद्यनाथ यांच्या पुतळ्याचे अनावरण मोदींच्या हस्ते करण्यात आले.

भाजपचे खासदार व हिंदुत्ववादी नेते योगी आदित्यनाथ यांचे ते गुरू होते. गोरखनाथ मंदिरात हा पुतळा उभारण्यात आला आहे. अवैद्यनाथ हे रामजन्मभूमी तसेच भाजपचे चार वेळा खासदार होते. २०१४ मध्ये त्यांचे निधन झाले.