‘नीट’ परीक्षेच्या विरोधात काही विद्यार्थ्यांनी स्वतंत्रपणे दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी फेटाळून लावली. त्यामुळे उद्या विद्यार्थ्यांना ‘नीट’ला निमूटपणे सामोरे जावे लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने ‘नीटसंदर्भात आपले आदेश बदलण्याची मागणी फेटाळून लावली. तारखांवर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी अभ्यास करण्याचा सल्लाही न्यायालयाने दिला. ‘सीबीएसई‘ आणि राज्य मंडळांच्या अभ्यासक्रमात फरक असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणार नाही, याकडे विद्यार्थ्यांच्या याचिकेत लक्ष वेधण्यात आले होते. मात्र, परीक्षेची तयारी करण्यापासून तुम्हाला कुणीही रोखले नाही, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने १ मे रोजी नियोजित असलेली परीक्षा होणारच असेही ठामपणे सांगितले.
वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच ‘नीट‘ घेतली जावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. याविरोधात केंद्र आणि राज्य सरकारांनी दाखल केलेल्या फेरविचार याचिकांवर सुनावणी घेण्यासही सर्वोच्च न्यायालयाने काल नकार दिला होता. न्यायालयाच्या या निर्णयावर पालक आणि विद्यार्थ्यांकडून मोठ्याप्रमाणावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील हा निर्णय अन्यायकारक असल्याचे सांगत ही परीक्षा २०१८ पासून लागू करण्याची मागणी केली आहे.