गेल्या वर्षभरापासून तुरुंगात असलेल्या सहारा‘श्रीं’च्या सुटकेसाठी विदेशातील तीन मालमत्तांसह मुंबईनजीकच्या अ‍ॅम्बी व्हॅलीची विक्री करून पैसे उभारा, तसेच ही मालमत्ता विक्रीची प्रक्रिया तीन महिन्यांत पूर्ण करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिले. याबाबत समूहाने न्यायालयाला सादर केलेल्या नव्या प्रस्तावात न्यूयॉर्क, लंडनमधील तीन आदरातिथ्य मालमत्ता तसेच मुंबई-पुणे दरम्यानच्या (लोणावळा) ‘अ‍ॅम्बी व्हॅली’चा समावेश आहे.
गेल्या वर्षभरापासून नवी दिल्लीच्या तिहार तुरुंगात असलेल्या सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय यांच्या जामिनासाठी १० हजार कोटी रुपयांच्या उभारणीसाठी सहाराला या मालमत्ता विकायच्या आहेत. गुंतवणूकदारांचे २० हजार कोटी रुपये परस्पर अन्य योजनांमध्ये वळविल्याच्या प्रकरणात सेबीने सुरू केलेल्या कारवाईत रॉय सध्या  गजाआड आहेत.
सहाराच्या लंडन आणि न्यूयॉर्क येथील मालमत्ता विक्रीची प्रक्रिया मध्यस्थांच्या फसवणुकीने खंडित झाली होती. तेव्हा ती पुन्हा सुरू करण्याची विनंती समूहाने सर्वोच्च न्यायालयाला केली. यानुसार सोमवारी अशी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यास न्यायालयाने होकार दर्शविला.
समूहाचे वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी लिलाव प्रक्रियेचा नवा मसुदा न्यायालयासमोर सोमवारी मांडला. याअंतर्गत स्पेनमधील बँक बीबीव्हीए ही रोख ९० कोटी युरो हाँगकाँगस्थित नोएम लिमिटेडला देण्यास तयार असल्याचे सांगण्यात आले. नोएम ही रक्कम सहाराचे थकीत असलेले कर्ज बँक ऑफ चीनला देण्यासाठी उपयोगात आणेल. याशिवाय नोएम अतिरिक्त १२ कोटी डॉलरही उभारणार आहे. रॉय यांच्या जामिनासाठी द्यावयाच्या १० हजार कोटी रुपयांपैकी बँक हमी असलेल्या (उर्वरित ५,००० कोटी रुपये रोख भरावयाचे आहेत) ५,००० कोटी रुपयांसाठी याच नोएम व अ‍ॅम्बी व्हॅलीच्या प्रवर्तक कंपनीबरोबर करार होईल, असे सांगण्यात आले.

अ‍ॅम्बी व्हॅली व शिवसेनेचे जुने नाते
लोणावळ्यानजीकचे आलिशान निवासी संकुल म्हणून सहारा समूहाचे ‘अ‍ॅम्बी व्हॅली’ ओळखले जाते. येथे सहाराने अनेक प्रसिद्ध क्रीडापटूंसह अभिनेत्यांनाही निवारा बहाल केला आहे. राज्यात शिवसेना-भाजप युतीच्या १९९५ च्या कारकिर्दीत या आलिशान शहराचे उद्घाटन झाले होते. मनोहर जोशी मुख्यमंत्री असतानाच्या काळात अ‍ॅम्बी व्हॅलीला सरकारकडून सर्व प्रकारच्या मान्यता मिळाल्या होत्या. यानंतर सुब्रतो रॉय यांच्या मुलाच्या लग्नाला समूहामार्फत करण्यात आलेल्या वैयक्तिक हेलिकॉप्टर सफरीचा लाभ दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही अन्य सेना नेत्यांसह घेतला होता.