कोंबड्यांचे होत असलेले हाल यावरून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान, सुनावणी पूर्ण होत असतानाच मुख्य न्यायाधीश टीएस ठाकूर यांनी सहा वरिष्ठ वकिलांना त्यांच्या आहार पद्धतीविषयी विचारणा केली. टीएस ठाकूर यांच्यासोबत न्यायाधीश एएम खानविलकर आणि न्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी सदर जनहित याचिकेवर सुनावणी केली. वरिष्ठ वकील केके वेणुगोपाल यांनी युक्तीवादाला सुरुवात करत म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाने थोडी जरी मदत केली तर पोल्ट्री फार्म आणि इतर ठिकाणी कोंबड्यांना ठेवण्याच्या पद्धतीत सुधारणा होऊ शकते. तसेच देशात पशू कल्याण कायद्याचे पालन होत नसल्याच्या मुद्दयावरही त्यांनी चर्चा केली.
पुढे वेणुगोपाल म्हणाले की, पोल्ट्री फार्मवाले कोंबड्यांच्या उत्पादनाला प्राधान्य देतात आणि यात नर पिल्लांना मारले जाते. कारण ते त्यांच्या काही कामाचे नसतात. त्यावर मुख्य न्यायाधिशांनी ‘वेणुगोपाल तुम्ही शाकाहारी आहात की मांसाहारी ?’ असा प्रश्न वकिलांना केला. तेव्हा मी पूर्णपणे मांसाहारी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वकील सिद्धार्थ लुथरा यांनीही आपण मांसाहारी असल्याचे सांगितले. २०१० आणि २०१३ साली बोर्डाने कोंबड्यांना पिंज-यात ठेवण्याच्या नियमांविषयी शिफारस केली होती. पण सरकारने याकडे दुर्लक्ष केले होते. सरकारची बाजू जाणून घेण्यासाठी सॉलिसीटर जनरल रणजीत कुमार यांची उपस्थिती आवश्यक होती. पण ते यावेळी न्यायालयात हजर नव्हते. त्यानंतर न्यायाधिशांनी वकिलांना कुमार यांच्या खानपानाविषयी विचारले असता ते शाकाहारी असल्याची माहिती खंडपीठास देण्यात आली. त्यावर मुख्य न्यायाधीश म्हणाले, असे वाटते की शाकाहा-यांच्या हक्कासाठी मांसाहारी लढतील किंवा याच्या उलटही होऊ शकते.