सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

एका अल्पवयीन मुलीने तिच्या आईसोबत इंग्लंडला न जाता वडिलांसोबतच राहण्याची इच्छा नि:संदिग्धपणे व्यक्त केल्यामुळे या कौटुंबिक वादाची सुनावणी करणाऱ्या न्यायालयाच्या मनातही काही प्रत्यवाय उरला नाही आणि त्यांनी तिचा ताबा वडिलांकडे सोपवला.

१५ वर्षांच्या या मुलीला पुरेशी परिपक्वता आली असून, ती इंग्लंडला जाऊ इच्छित नसल्याने तिला तिच्या इच्छेविरुद्ध परदेशी पाठवण्याची जोखीम आम्ही घेऊ शकत नाही. कारण हिच्यासारख्या एका परिपक्व मुलीला आम्ही जबरीने परदेशात पाठवले, तर तो तिच्यासाठी क्षुब्ध करणारा व दु:खदायक अनुभव असेल आणि ते तिच्या हिताचे राहणार नाही, असे न्या. ए. के. सिक्री व न्या. आर. के. अग्रवाल यांच्या खंडपीठाने सांगितले.

या मुलीचा तात्पुरता ताबा तिच्या आईकडे सोपवून तिला पुरेशी संधी देण्यात येऊनही मुलीचा विश्वास जिंकण्यात ती अपयशी ठरली. ही मुलगी वडिलांसोबतच आनंदी असून त्यांच्यासोबतच राहू इच्छिते, हे न्यायालयाने नमूद केले.

या मुलीचा ताबा वडिलांकडेच राहणे आवश्यक असल्याबद्दल आमची खात्री झाली आहे. ती आताच १५ वर्षांची असून तीन वर्षांत ती सज्ञान होईल आणि तिच्या पालकांमध्ये तिचा ताबा मिळवण्यासाठी सुरू असलेली लढाई संपेल. त्यानंतर आयुष्यात तिला काय करायचे आहे याबाबतचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य तिला असेल, असे न्यायालयाने सांगितले.

आता विभक्त झालेल्या या जोडप्याचा विवाह १९९९ साली झाला होता. मार्च २००० मध्ये ते इंग्लंडमध्ये स्थायिक झाल्यानंतर त्यांचा वैवाहिक कलह सुरू झाला. या मुलीचा जन्म जानेवारी २००२ मध्ये दिल्लीत झाला होता.