सर्वोच्च न्यायालयाचा उद्विग्न सवाल; महिलांवरील अत्याचाराबाबत चिंता

स्त्री-पुरुष समानतेपासून भारतीय समाज कोसो दूर असल्याचे महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांतून अधोरेखित होत असताना सर्वोच्च न्यायालयानेही या मुद्दय़ावर आपला सात्त्विक संताप व्यक्त केला. ‘‘या देशात महिला शांततेत का जगू शकत नाही,’’ असा उद्विग्न सवाल न्यायालयाने केला.

एकतर्फी प्रेमातून एका अल्पवयीन मुलीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपीने हिमाचल प्रदेशच्या उच्च न्यायालयाने सुनावलेल्या सात वर्षांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर सुनावणी घेताना न्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश ए. एम. खानविलकर यांच्या खंडपीठाने आरोपीच्या वकिलांना फटकारत महिलांच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. ‘‘प्रेमाची एक परिभाषा आहे. कोणावर प्रेम करावे, हे ठरविण्याचा अधिकार महिलेला आहे. एखाद्या व्यक्तीवर प्रेम करावे किंवा करू नये, हे तिच्या मर्जीवर आहे. त्यामुळे कोणी तिच्यावर प्रेमासाठी दबाव टाकू शकत नाही,’’ असे खडे बोल आरोपीला सुनावतानाच ‘‘या देशात महिला शांततेने का जगू शकत नाहीत,’’ असा उद्विग्न सवाल न्यायालयाने केला.

न्यायालयाने फटकारल्यानंतर आरोपीच्या वकिलांनी मुलीच्या आत्महत्येमागच्या कारणांवर संशय व्यक्त केला. ‘‘ही मुलगी ८० टक्के भाजली होती आणि तिने लेखी जबानी देणे शक्य नव्हते, असे डॉक्टरांनी म्हटले आहे. तिचे दोन्ही हात भाजले होते. ती काही लिहिण्याच्या किंवा बोलण्याच्या स्थितीत नव्हती,’’ असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला. त्यावर ‘‘तुम्हीच निर्माण केलेल्या स्थितीमुळे तिला हे पाऊल उचलावे लागले,’’ असे खडसावत न्यायालयाने मुलीच्या आत्महत्येला आरोपीस जबाबदार धरले. मात्र, या प्रकरणाचा निर्णय न्यायालयाने राखून ठेवला.

कन्यारत्न झाल्याने दूरध्वनीवरून तलाक

लखनौ : तिहेरी तलाकचा मुद्दा सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असताना उत्तर प्रदेशात मुलगी झाल्याने एका महिलेला फोनवरून तलाक देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शुमला जावेद असे या पीडित महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे शुमला या राष्ट्रीय पातळीवरील नेटबॉल खेळाडू आहेत. शुमला यांना कन्यारत्न झाल्याने संतापलेल्या तिच्या पतीने फोनवरूनच तीनदा ‘तलाक’ हा शब्द उच्चारत काडीमोड घेतला.

नागपुरात आणखी एका मुलीवर सामूहिक बलात्कार

नागपूर : आमदार निवासातील सामूहिक बलात्काराचे प्रकरण ताजे असतानाच महिला सुधारगृहातून पळून गेलेल्या अल्पवयीन मुलीवर चौघांनी बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गतिमंद असलेल्या या मुलीला जेवण देण्याचे प्रलोभन दाखवून आरोपींनी शुक्रवारी रात्री तिचे अपहरण करून बलात्कार केला. पोलीस ठाणे हाकेच्या अंतरावर असताना घडलेल्या या घटनेमुळे गुन्हेगारांना भय उरलेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.