सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर वाहननिर्मात्यांची धावाधाव

आमची दुचाकी घेतली तर हेल्मेट मोफत, विमा मोफत, शिवाय खरेदीवर अमुक हजारांपर्यंत सूट, ‘कॅश बॅक’चाही प्रस्ताव आहेच.. या व अशा असंख्य सवलतींची जंत्रीच सादर करणारे दूरध्वनी गुरुवारी अनेक वाहनधारकांना येऊ लागले.. त्यातही अट एकच- तुम्ही आज, ३१ मार्चपर्यंत आमच्याकडील वाहनाची खरेदी करायची, निदान ‘बुकिंग’ तरी करावे! प्रदूषणकारी वाहनांना अटकाव करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हा परिणाम..

‘भारत स्टेज-३’ प्रमाणपत्र असलेल्या वाहनांच्या विक्रीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घालताच धाबे दणाणलेल्या वाहननिर्मात्या कंपन्यांनी आपापल्या वाहनांच्या विक्रीवर भरघोस सूट देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न गुरुवारी केला. उत्सर्जन करून प्रदूषणात भर घालणाऱ्या ‘भारत स्टेज-३’ प्रमाणपत्रधारक वाहनांना १ एप्रिलपासून बंदी घालण्यात आली आहे. ‘भारत स्टेज-३’ प्रमाणपत्रधारक तब्बल आठ लाख वाहने वाहननिर्मात्यांकडे आहेत. त्यात सहा लाख ७१ हजार दुचाकींचा समावेश आहे. ३१ मार्चपर्यंत या गाडय़ा विकल्या न गेल्यास त्या एक तर भंगारात तरी काढाव्या लागणार आहेत अथवा त्यांची निर्यात तरी करावी लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे दुचाकी निर्मात्यांनी गुरुवारी घाईघाईने निर्णय घेत खरेदीवर विविध सवलती जाहीर केल्या. त्यात हिरो मोटोकॉर्प, होंडा मोटारसायकल्स, सुझुकी मोटारसायकल, बजाज स्कूटर्स आदी दुचाकी निर्मात्यांचा समावेश आहे.

दरम्यान, व्यावसायिक वाहनांची निर्मिती करणाऱ्या अशोक लेलँड व महिंद्रा अँड महिंद्रा यांनी मात्र त्यांच्या वाहनांवर कोणत्याही प्रकारची सूट देऊ केलेली नाही.

तूर्तास तरी आमचे लक्ष आमच्याकडील गाडय़ांचा ‘स्टॉक’ संपवण्याकडे आहे. ३१ मार्चनंतरही गाडय़ा विक्रीसाठी शिल्लक राहिल्याच तर त्याचा निर्णय वाहननिर्माते आणि डीलर यांच्या चर्चेतून घेण्यात येईल.  निकुंज संघी, माजी अध्यक्ष, ऑटोमोबाइल डीलर्स महासंघ

सवलती अशा..

  • होंडा मोटरसायकल्स : कंपनीने ‘भारत स्टेज-३’च्या स्कूटर आणि मोटारसायकलींवर २२ हजार रुपयांची सवलत जाहीर केली आहे. त्यात अ‍ॅक्टिवा थ्रीजी, ड्रीम युगा, सीबी शाइन आणि सीडी ११०डीएक्स या गाडय़ांचा समावेश
  • हिरो मोटोकॉर्प : हिरोच्या स्कूटर खरेदीवर साडेबारा हजारांपर्यंत सूट, प्रीमियम बाइक्सच्या खरेदीवर साडेसात हजारांची सूट आणि एन्ट्री लेव्हलच्या मोटारसायकलींच्या खरेदीवर पाच हजारांपर्यंत सूट. यात डय़ुएट, मॅस्ट्रो एज, ग्लॅमर आणि स्प्लेंडर यांचा समावेश
  • सुझुकी मोटारसायकल : लेट्स स्कूटर खरेदीवर चार हजारांची सवलत आणि हेल्मेट मोफत, जिक्सरच्या खरेदीवर पाच हजारांपर्यंत सवलत व दोन हजारांचा ‘एक्स्चेंज’ लाभ.
  • बजाज ऑटो : प्लॅटिनापासून पल्सर आरएस२०० पर्यंत विविध प्रकारच्या दुचाकी खरेदीवर तीन ते बारा हजार रुपयांपर्यंतची सवलत आणि विमा मोफत