काँग्रेसचे माजी मुंबई विभागीय अध्यक्ष व आमदार कृपाशंकर सिंह आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्धच्या बेहिशेबी संपत्तीप्रकरणी दोन महिन्यांच्या आत अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एच. एल. दत्तू यांनी सोमवारी विशेष तपास पथकाला (एसआयटी) दिले.
एसआयटीकडून या प्रकरणाच्या तपासात होत असलेल्या दिरंगाईबद्दल न्या. दत्तू यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर एसआयटीच्या वतीने अहवाल सादर करण्यासाठी सहा आठवडय़ांचा अवधी मागण्यात आला, पण न्यायालयाने सहाऐवजी आठ आठवडय़ांमध्ये अहवाल सादर करण्याची मुभा दिली. मात्र या कालावधीत सर्व चौकशी पूर्ण करण्याचे आदेश देताना याप्रकरणी आणखी मुदतवाढ मिळणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
कृपाशंकर सिंह आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी बेहिशेबी संपत्ती जमविल्याचे धडधडीत पुरावे असताना विशेष तपास पथक त्यांना अटक का करीत नाही, असा सवाल ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी याचिकाकर्त्यांकडून युक्तिवाद करताना केला.
कारवाईत विलंब करून विशेष तपास पथक कृपाशंकर यांच्या कुटुंबीयांच्या गुन्हेगारी कृत्याला मदत करीत असल्याचा आरोपही त्यांनी सुनावणीदरम्यान केला.