मुंबईतील मुस्लिम धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या वरळी येथील हाजी अली दर्ग्यातील ‘मझार’च्या परिसरात महिलांना प्रवेश देण्यास हाजी अली ट्रस्टने अखेर होकार दर्शविला आहे. सर्वोच्च न्यायालयातील सोमवारच्या सुनावणीदरम्यान हाजी अली ट्रस्टच्या विश्वस्तांनी न्यायालयाला ही माहिती दिली. त्यामुळे आता महिलादेखील हाजी अली दर्ग्यातील मझारपर्यंत जाऊ शकणार आहेत. मझारपर्यंत जाण्यासाठी महिलांसाठी वेगळा मार्ग तयार करण्यात येणार असून त्यासाठी दोन आठवड्यांची मुदत देण्यात यावी, अशी विनंती हाजी अली ट्रस्टने न्यायालयाला केली. न्यायालयाने ही मागणी मान्य केली आहे. दक्षिण मुंबईतील या प्रसिद्ध दर्ग्यात महिलांना प्रवेशास असेलली बंदी उठवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने २६ ऑगस्टला दिला होता. भारतीय मुस्लीम महिला आंदोलन या स्वयंसेवी संस्थेच्या झाकिया सोमण व नूरजहाँ नियाझ या महिलांनी केलेली जनहित याचिका उच्च न्यायालयाने मान्य केली होती. दुसरीकडे तृप्ती देसाई यांनीदेखील आंदोलन छेडले होते.  या याचिकेवर हायकोर्टाने ऑगस्टमध्ये निकाल देताना महिलांना मझारपर्यंत प्रवेश देण्याचा निर्णय दिला होता.  महिलांना प्रवेशबंदी राज्यघटनेच्या कलम १४, १५ आणि २१ मधील तरतुदींच्या विरोधात आहे. त्यामुळे ती आम्ही रद्द ठरवत असल्याचे न्यायालयाने निकाल देताना स्पष्ट केले होते. या निर्णयाविरोधात हाजी अली ट्रस्टने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.