व्हॉट्सअॅपच्या इंक्रिप्शन पॉलिसीवरुन सध्या वाद सुरू असला तरी भारतात व्हॉट्सअॅप बंद करण्यासाठी हरियाणातील एका याचिकाकर्त्याने दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने गुरूवारी फेटाळून लावली. व्हॉट्सअॅपने सुरू केलेल्या सुरू केलेल्या इंक्रिप्शन सुविधेमुळे व्हॉट्सअॅपच्या डाटाची सुरक्षाप्रणाली मोडून काढणं शक्य होणार नाही. जर सरकारने व्हॉट्सअॅपकडून एखाद्या व्यक्तीचा डाटा मागविला, तर ते मेसेजेसला डिकोट करू शकणार नाहीत. त्यामुळे भारतात व्हॉट्सअॅपवर बंदी टाकण्यात यावी, अशी याचिका हरियाणाच्या गुडगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ते सुधीर यादव यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश टी.एस.ठाकूर आणि न्यायाधीश ए.एम.खानविलकर यांच्या खंडपीठाने सुधीर यादव यांची याचिका फेटाळून लावली. सुधीर यादव यांनी हे प्रकरण न्यायालयात मांडण्याऐवजी सरकारकडे किंवा भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे (ट्राय) मांडावे, असा सल्ला कोर्टाने दिला आहे.
व्हॉट्सअॅपने एप्रिल महिन्यात सुरू केलेल्या इंक्रीप्शन पॉलीसीमुळे देशातील सुरक्षा व्यवस्थांना दहशतवाद्यांचा मागोवा घेता येणार नाही. याशिवाय, इंक्रीप्शन पॉलीसीमुळे दहशतवादी देखील कोणत्याही भीतीविना आपले कटकारस्थान रचण्यात यशस्वी होतील, अशी भीती सुधीर यावद यांनी याचिकेतून व्यक्त केली होती.