एका मासिकाच्या मुखपृष्ठावर भगवान विष्णूच्या रूपात धोनीचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आल्याप्रकरणी धोनीविरोधात सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीला आणि त्याच्यावर बजावण्यात आलेल्या वॉरंटला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती दिली. त्याचबरोबर हा खटला आंध्र प्रदेशमधील अनंतपूरमधून बेंगळुरूमध्ये स्थलांतरित करण्यात यावा, या धोनीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने आंध्र प्रदेश पोलिसांकडून प्रतिसाद मागविला आहे.
महेंद्रसिंग धोनीच्या विरोधात ८ जानेवारीला अनंतपूरमधील न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. एका मासिकाच्या मुखपृष्ठावर भगवान विष्णूच्या रूपात धोनीचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते वाय. श्यामसुंदर यांनी तक्रार दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका धोनीवर ठेवण्यात आला. मात्र धोनीचे वकील रजनीश चोप्रा यांनी या आरोपांचे खंडन केले. तसेच धोनीविरोधातील अजामीनपात्र वॉरंट चुकीचे असल्याचा दावाही त्यांनी केला होता. आता सर्वोच्च न्यायालयाने याला स्थगिती दिल्यामुळे धोनीला दिलासा मिळाला आहे.