राम मंदिर-बाबरी मशीदप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका दाखल करण्यात आल्या असून त्यावर शक्य तितक्या लवकर सुनावणी घेण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले.या बाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे सरन्यायाधीश जे. एस. खेहर आणि न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या पीठाने स्पष्ट केले. भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी, या प्रकरणी तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली. त्यानंतर पीठाने वरील बाब स्पष्ट केली.

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधीतील मुख्य याचिका गेल्या सात वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत त्यामुळे त्यावर तातडीने सुनावणी होणे गरजेचे आहे, असे डॉ. स्वामी म्हणाले. अयोध्येतील वादग्रस्त ठिकाणी प्रार्थना करण्याच्या आपल्या अधिकाराची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र याचिका आपण सादर केली आहे, असेही ते म्हणाले.या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची अनुमती आपल्याला सर्वोच्च न्यायालयाने दिली असून प्रकरणे लवकर निकाली काढावी, असेही डॉ. स्वामी यांनी म्हटले आहे.