सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी
उत्तराखंड विधानसभेत सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली शक्तिपरीक्षा घेण्याबाबत केंद्र सरकारने भूमिका मांडावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. या प्रकरणावर आज, बुधवारी सुनावणी घेण्यात येणार आहे.
उत्तराखंडमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट लागू असून सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेतील शक्तिपरीक्षेला तूर्तास स्थगिती दिली होती. या प्रकरणावर न्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्यायाधीश शिवकीर्ती सिंग यांच्या खंडपीठापुढे मंगळवारी दुपारी २ वाजता सुनावणी होणार होती. मात्र, न्यायाधीश सिंग यांचा सहभाग असलेल्या दुसऱ्या खंडपीठात २ वाजता ‘नीट’प्रश्नी सुनावणी असल्याचे नमूद करीत न्या. मिश्रा आणि न्या. सिंग यांच्या खंडपीठाने सकाळी १०.३० वाजता उत्तराखंडप्रश्नी सुनावणी घेतली. उत्तराखंडच्या विधानसभेत सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली शक्तिपरीक्षा घेण्याबाबत केंद्र सरकारने विचार करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले. याबाबत बुधवारच्या सुनावणीत माहिती द्यावी, असे न्यायालयाने महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांना सांगितले.

केंद्राच्या भूमिकेकडे लक्ष
उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट रद्द करण्याच्या उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या निर्णयाला २२ एप्रिलला सर्वोच्च न्यायालयाने २७ एप्रिलपर्यंत स्थगिती दिली होती. सर्वोच्च न्यायालयाने २७ एप्रिलला घेतलेल्या सुनावणीत या स्थगितीला मुदतवाढ देत केंद्र सरकारला सात प्रश्न विचारत त्यात आणखी प्रश्नांची भर घालण्याची सूचना मुकुल रोहतगी यांना केली होती. आता केंद्र बुधवारी न्यायालयात काय भूमिका घेते, यावर उत्तराखंडमधील शक्तिपरीक्षा अवलंबून राहणार आहे.