शिक्षक भरती घोटाळ्यात हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौताला व इतरांना दोषी ठरवण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने उचलून धरला आहे. त्यांना यात दहा वर्षे तुरूंगवासाची शिक्षा झाली आहे. चौताला व इतरांनी दाखल केलेली आव्हान याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायपीठाचे न्यायाधीश एफ.एम.आय कलीफुल्ला व शिवकीर्ती सिंह यांनी सांगितले की, या अपिलाची सुनावणी करण्यासारखी स्थिती नाही, त्यामुळे हे अपील फेटाळण्यात येत आहे. ऐंशी वर्षांचे चौताला यांनी केलेले अपील व त्यांचे पुत्र अजय सिंह चौताला व इतरांचे अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले व दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेला निकाल बरोबर असल्याचे सांगितले.
आरोग्याच्या कारणास्तव कुणाला पॅरोल हवा असेल तर त्यांनी उच्च न्यायालयाकडे अर्ज करावेत, असे न्यायालयाने म्हटले आहे. चौताल व त्यांचे पुत्र तसेच इतर तीन जणांना शिक्षक नोकर भरती घोटाळ्यात १० वर्षे तुरूंगवासाची शिक्षा झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशांनी चौताला यांच्या सुनावणी प्रकरणातून माघार घेतली होती, कारण त्यांनी एकदा आरोपीच्या वतीने वकील असताना बाजू मांडली होती. उच्च न्यायालयाने ५ मार्च रोजी चौताला व त्यांचे पुत्र अजय यांना ठोठावलेली शिक्षा योग्य ठरवली होती व त्यात त्यांच्याविरोधात मोठे पुरावे असल्याचे म्हटले होते. चौताला पितापुत्र व दोन आयएएस अधिकारी यांना कनिष्ठ न्यायालयाने २०१३ मध्ये हरयाणातील २००० मधील भरती घोटाळ्यात दोषी ठरवले होते. त्यात आयएएस अधिकारी विद्या धर, शेर सिंह बदशामी व आमदार तसेच चौताला यांचे राजकीय सल्लागार यांचा समावेश आहे.  सुरूवातीला या प्रकरणात ६२ आरोपी होते व नंतर दोन जण आरोपपत्र दाखल होण्याच्या आधी मरण पावले तर एकाला कनिष्ठ न्यायालयाने निर्दोष ठरवले होते.