राष्ट्रपतिपदी धर्मनिरपेक्ष उमेदवार असावा ही काळाची गरज आहे त्यामुळे विरोधी पक्ष निश्चितपणे राष्ट्रपतिपदासाठी उमेदवार उभा करील, असे भाकपचे सरचिटणीस एस. सुधाकर रेड्डी यांनी मंगळवारी येथे स्पष्ट केले.

केंद्रातील रालोआ सरकारने सोमवारी बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली. तथापि, सरकारच्या या निर्णयाने विरोधी पक्षांचे समाधान झाले नाही, त्यामुळे कोविंद यांना पाठिंबा द्यावयाचा की नाही याचा निर्णय अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे.

राष्ट्रपतिपदाचा उमेदवार निश्चित करण्यासाठी विरोधी पक्षांची २२ जून रोजी बैठक होणार आहे. कोविंद यांना आमचा वैयक्तिक विरोध नाही तर तात्त्विक विरोध आहे, असे रेड्डी म्हणाले.

रामनाथ कोविंद यांचा बिहारच्या राज्यपालपदाचा राजीनामा

बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. केंद्रातील सत्तारूढ रालोआने कोविंद यांची राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केल्यानंतर त्यांनी राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी कोविंद यांचा राजीनामा स्वीकारला आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे बिहारच्या राज्यपालपदाची सूत्रे देण्यात आली आहेत.